Rohit Pawar News : येत्या काही दिवसांनी महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुकांचा बिगुल वाजणार आहे. याआधीच मात्र कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघाचे आमदार रोहित पवार यांनी एक मोठे विधान केले आहे. खरे तर गेल्या काही दिवसांपासून राज्याचे राजकीय वातावरण पूर्णपणे तापलेले आहे. महाविकास आघाडी आणि महायुती जागा वाटपावर जोरदार मंथन करत आहे. अजून दोन्ही गटांचे जागावाटप फायनल झालेले नाही.
परंतु लवकरच जागावाटप फायनल होईल आणि महायुती आणि महाविकास आघाडीच्या उमेदवारांची यादी समोर येणार आहे. तत्पूर्वी मात्र इच्छुक उमेदवारांच्या माध्यमातून तयारी सुरू करण्यात आली आहे. इच्छुक उमेदवार पक्षश्रेष्ठींवर दबाव बनवत आहे. तसेच, काही इच्छुक उमेदवार वेगळी भूमिका घेण्याच्या तयारीत सुद्धा आहेत.
याच पार्श्वभूमीवर शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या भेटीला विविध पक्षातील लोक त्यांच्या निवासस्थानी गर्दी करत आहेत. यामुळे शरद पवार गट विधानसभेत किती जागांवर निवडणूक लढवणार, शरद पवार कोणा कोणाला पक्षात प्रवेश देणार? अशा चर्चा सुरु आहेत. दरम्यान, या चर्चा ताज्या असतानाच आता शरद पवार यांचे नातू आणि कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी मोठे विधान करत एक मोठा गौप्यस्फोट केला आहे.
रोहित पवारांनी आज अनेक मोठमोठे खुलासे केले आहेत, तसेच त्यांनी मुख्यमंत्री पदाबाबत देखील स्पष्टीकरण दिले आहे. पुण्यातील पत्रकार परिषदेत बोलताना रोहित पवार यांनी, शरद पवार साहेब विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या संपूर्ण राज्यात फिरत आहेत. त्यावेळी राज्यात महाविकास आघाडीला चांगले पूरक वातावरण पाहायला मिळत आहे.
यामुळे अनेकजण शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात सामील होण्यास इच्छुक आहेत. दरम्यान, पक्षात होणाऱ्या इन्कमिंगच्या चर्चांमुळे पक्षातील काही लोक नाराज असल्याच्या चर्चा सुरू आहेत. काही लोक नक्कीच या चर्चांमुळे नाराज असतील. मात्र कोणीही नाराज होऊ नये पवार साहेब जो निर्णय घेतील तो विचार करून घेतील.
असा निर्णय घेताना कोणी नाराज होणार नाही याची काळजी पवार साहेब घेतील, असं सांगितलं आहे. तसेच महाराष्ट्रातील अनेकजण संपर्कात आहेत, मात्र निष्ठावंतांना विसरून चालणार नाही. ज्यांनी महाराष्ट्र धर्म सोडून दिल्लीवाल्यांची चाकरी केली त्यांना परत घेतले जाणार नाही. काही ठराविक लोकांनाच पक्षात घेतले जाईल.
परंतु भारतीय जनता पक्ष आणि अजितदादा गटातील अनेक लोक शरद पवार यांच्या संपर्कात असल्याचा मोठा दावा रोहित पवारांनी केला आहे. रोहित पवारांच्या या वक्तव्यामुळे सध्या महाराष्ट्रातील राजकारणात मोठी खळबळ माजली आहे. राज्यातील राजकारणात पुन्हा भूकंप होणार की काय अशा चर्चांचे गुऱ्हाळ आता सर्वत्र सुरू आहे.
राजकीय विश्लेषक देखील रोहित पवारांच्या या वक्तव्यानंतर अलर्ट झाले असून त्यांच्या या वक्तव्याचे वेगवेगळे निष्कर्ष काढले जात आहेत. दरम्यान, आजच्या या पत्रकार परिषदेत जागा वाटपावर सुद्धा प्रश्न विचारण्यात आले होते. रोहित पवारांना पत्रकारांनी तुमचा पक्ष किती जागा लढवणार असा प्रश्न विचारला होता.
याला उत्तर देताना रोहित पवार यांनी जेवढे शरद पवार साहेबांचे वय आहे तेवढ्या आमच्या जागा निवडून याव्यात अशी आमची अपेक्षा आहे. आमच्या 85 जागा निवडून याव्यात अशी आमची इच्छा असून यासाठी आम्ही प्रयत्न करणार असल्याचे रोहित पवारांनी म्हटले आहे. मुख्यमंत्री कसा असला पाहिजे याबाबत बोलताना रोहित पवार यांनी मुख्यमंत्री हा महाराष्ट्राचे विजन पुढे नेणारा असायला हवा. मात्र सध्याचे सरकार हे गुजरातचे विचार पुढे नेत असल्याचे म्हणत रोहित पवारांनी महायुती सरकारवर टीका केली आहे.
मुख्यमंत्री पदाबाबत स्पष्ट केली भूमिका
रोहित पवार भावी मुख्यमंत्री, भावी मंत्री अशा आशयाचे पोस्टर कार्यकर्त्यांच्या माध्यमातून संपूर्ण राज्यभर लावले जात आहेत. शरद पवार यांनी देखील रोहित पवार हे मंत्री होतील असे संकेत दिले होते. यामुळे या संदर्भात रोहित पवारांना प्रश्न विचारण्यात आला होता. यावर उत्तर देताना रोहित पवार यांनी, कोण मुख्यमंत्री ? कोण मंत्री ? याचा विचार करण्यापेक्षा महायुती सरकार हद्दपार करणे महत्वाचे आहे. पदाचा विचार करण्यापेक्षा महायुतीला हद्दपार करण्याचा विचार केला पाहिजे. पोस्टर लावून कोणी मंत्री किंवा मुख्यमंत्री होत नसतं, त्यासाठी कष्ट करावे लागतात. मात्र कार्यकर्ते प्रेमापोटी पोस्टर लावतात असे रोहित पवार यांनी म्हटले आहे.