Maharashtra Politics : भारतीय जनता पक्ष लोकनेत्यांना संपवतो. तिकडे गेलेल्या आमच्या नेत्यांनाही हळूहळू संपवतील. भाजपला लोकसभा निवडणुकीचे पडले आहे. त्यांना बाकी काही देणेघेणे नाही. स्वार्थी राजकारणासाठी काहीजण भाजपसोबत गेले आहेत.
लोकसभा निवडणूक झाल्यानंतर अनेकांना कमळावर लढावे लागेल, असे भाकीत करत आमदार रोहित पवार यांनी सोमवारी पिंपरीमध्ये भाजप व अजित पवार गटावर टीका केली. तसेच आम्ही शेवटपर्यंत भाजपविरुद्ध ताकदीने लढू, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला
आमदार पवार म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेस हा एकच पक्ष असून स्वहित, स्वार्थी राजकारणासाठी काहीजण तिकडे गेले. आता तिकडे त्यांची खिचडी झाली आहे. शहरात संघटना म्हणून खूप मोठी ताकद लावू. अनेकांशी बोलणे झाले असून लवकरच तिकडे गेलेले इकडे बघायला मिळतील.
निवडणूक आयोग भाजपच्या हातातील बाहुले आहे. त्यामुळे आयोग आम्हाला चिन्ह, नाव देणार नाही पण आमच्याकडे पवार साहेब आहेत. त्यामुळे आम्ही लढणार आणि जिंकणार आहोत.
पिंपरी-चिंचवड स्वाभिमानी शहर आहे. यशवंतराव चव्हाण, शरद पावर यांच्या दूरदृष्टीतून शहराची जडणघडण झाली. शरद पवार केंद्रात मंत्री असताना शहरातील विकासासाठी जेएनआरयूएम अंतर्गत तीन हजार कोटींपेक्षा जास्त निधी दिला आहे.
दूरदृष्टी ठेवून निधी दिला. त्यामुळेच शहरात प्रशस्त रस्ते, पूल झाले. त्यावेळी अजित पवार राष्ट्रवादीचे नेतृत्व करत होते. हा निधी त्यांनी योग्य पद्धतीने वापरला. मागच्या भाजपच्या पाच वर्षांत कोणती मोठी विकासकामे झाली आहेत.
७० टक्के गुजरातच्या कंपनीला दिल्याचे दिसते. एकाच कामावर वारंवार खर्च केला जातो. आवास योजना, चोवीस तास पाणी याचे आश्वासन भाजपने पाळले नाही. भाजपने विरोधी नगरसेवकांना निधी दिला नाही. राजकारणात शहराचा विकास खुंटला आहे, असेही रोहित पवार यांनी सांगितले.