Karjat News : कर्जत नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा उषा अक्षय राऊत यांच्या राजीनाम्यानंतर रिक्त झालेल्या पदासाठी नव्या नगराध्यक्ष निवडीचा कार्यक्रम अधिकृतपणे घोषित करण्यात आला आहे. येत्या २ मे रोजी विशेष सभेचे आयोजन करून, प्रांताधिकारी नितीन पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मतदान प्रक्रियेच्या माध्यमातून नवीन नगराध्यक्षाची निवड करण्यात येणार आहे.
अविश्वास ठरावाआधीच राजीनामा
सत्ताधारी गटातील ११ आणि भाजपचे २ अशा एकूण १३ नगरसेवकांनी उषा राऊत यांच्या विरोधात अविश्वास ठराव दाखल केला होता. मात्र अविश्वास ठरावावर प्रक्रिया सुरू होण्यापूर्वीच राऊत यांनी स्वतःहून आपला राजीनामा जिल्हाधिकारी कार्यालयात सादर केला. त्यामुळे विशेष सभेत अविश्वास ठरावावर मतदान होण्याची आवश्यकता उरली नाही.

निवडणुकीचा तपशीलवार कार्यक्रम
जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांच्या आदेशानुसार, कर्जत नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष निवडीची प्रक्रिया पुढीलप्रमाणे निश्चित करण्यात आली आहे:
२८ एप्रिल रोजी इच्छुक उमेदवारांनी मुख्याधिकाऱ्यांकडे नामनिर्देशन पत्र दाखल करायचे आहे.
त्याच दिवशी अर्जांची छाननी करून पात्रता निश्चित केली जाईल.
२९ एप्रिल हा उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा अंतिम दिवस ठरवण्यात आला आहे.
२ मे रोजी नगरपंचायतीच्या सभागृहात विशेष सभा घेऊन, नगरसेवकांच्या मतदानाद्वारे नवीन नगराध्यक्षाची निवड होईल.