Sanjay Raut : काही दिवसांपूर्वीच जेलमधून बाहेर आलेले ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांच्या अडचणीत पुन्हा वाढ होताना दिसत आहेत. आता त्यांच्या विरोधात नाशिकमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामुळे ठाकरे गटाचा हुकमी एक्का पुन्हा एकदा अडचणीत आला आहे. यामुळे आता उद्धव ठाकरे यांच्यापुढील टेन्शन अजूनच वाढले आहे.
शिवसेना पक्ष चिन्ह आणि नाव शिंदे गटाला गेल्यानंतर ठाकरे गटातील मोठ्या नेत्यावर दाखल करण्यात आलेला हा पहिला गुन्हा आहे. पंचवटी पोलिस ठाण्यात राऊतांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. यामुळे ठाकरे गट अजूनच आक्रमक होण्याची शक्यता आहे.
संजय राऊत यांनी काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केले होते. यामुळे शिंदे गटाचे नेते योगेश बेलदार यांनी तक्रार दिली होती. राऊत यांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्याबद्दल चाटूगिरी असा शब्द वापरला होता. यामुळे शिंदे गट आक्रमक झाला आहे. राऊतांनी एकनाथ शिंदे यांच्यावर आक्षेपार्ह भाषेत टीका केली होती.
दरम्यान, या तक्रारीत एकनाथ शिंदे यांच्यासारख्या व्यक्तीच्या मुख्यमंत्री पदाच्या लौकिकास बाधा आणून बदनामी केल्याचे म्हटले आहे. यामुळे राऊत यांच्याविरोधात कलम ५०० अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. यामुळे राऊत आता अडचणीत येण्याची शक्यता आहे.
आता या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करीत आहेत. दरम्यान, राज्यभरात शिंदे गट विरुद्ध ठाकरे गट असा संघर्ष पाहायला मिळत आहे. या परिस्थितीत रविवारी दादरमध्ये शिवसेना भवनासमोर ठाकरे गटाने शक्तीप्रदर्शन केले. येणाऱ्या काळात हा संघर्ष अधिकच वाढण्याची शक्यता आहे.