Sanjay Raut : सध्या विधानसभेत मोठा गोंधळ बघायला मिळत आहे. रोज वेगवेगळी वक्तव्य केली जात आहेत. यामुळे विरोधक आणि सत्ताधारी यांच्यात रोज बाचाबाची होत आहे. यामुळे कामे बाजूला राहत आहेत आणि आमदारांची भांडण बघायला मिळत आहेत. आता विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी एक पत्र लिहिले आहे.
त्यांनी उपसभापती नीलम गोऱ्हेंना पत्र पाठवत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याविरोधात हक्कभंग प्रस्ताव आणावा, अशी मागणी केली आहे. यामुळे आता मुख्यमंत्री अडचणीत आले आहेत. मुख्यमंत्र्यांनी विरोधकांचा देशद्रोह असा उल्लेख केल्याने त्यांच्याविरोधात हक्कभंग आणावा, अशी मागणी दानवे यांनी केली.
यामुळे रोज कारवाई, हक्कभंग असे शब्द कानी पडत आहेत. असे असताना यावर संजय राऊत यांनी देखील प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. ते म्हणाले, पंडित नेहरुंपासून ते मनमोहन सिंह यांच्यापर्यंत, प्रत्येक पंतप्रधान, राष्ट्रपती, सत्ताधाऱ्यांनी विरोधकांचा आवाज नेहमी ऐकला आहे.
असे असताना सध्याची परिस्थिती वेगळी बनवली आहे. जेव्हा आवाज दडपण्याचा प्रयत्न आणीबाणीच्या माध्यमातून झाला तेव्हा तो त्या सत्ताधाऱ्याचा पराभव देशातील जनतेने केला. विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांची भूमिका योग्य असल्याचे ते म्हणाले.
दरम्यान, मुख्यमंत्र्यांचे विधान हे विरोधकांना देशद्रोही ठरवण्याचे आहे. सर्वोच्च न्यायालय हा आशेचा एकमेव किरण सध्या या देशासाठी आहे. बाकी सर्व मंदिर ही नावाची मंदिर राहिली आहेत. त्या मंदिरात चप्पल चोरांचीच गर्दी जास्त आहे.
आम्ही लोकशाहीचे कार्यकर्ते हे सर्वोच्च न्यायालयाकडे फार अपेक्षेने पाहत आहेत. आम्हाला खात्री आहे, तिथे निकाल लागणार नाही तर न्याय मिळेल, असेही संजय राऊत यांनी म्हटले आहे. त्यांनी यावेळी शिंदे सरकारवर जोरदार टीका केली.