Sanjay Raut : सध्या आमदार प्रकाश सुर्वे आणि शिवसेनेच्या प्रवक्त्या शीतल म्हात्रे यांच्या व्हायरल व्हिडिओवरुन राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. या प्रकरणावरून सध्या आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. असे असताना आता खासदार संजय राऊत यांनी यावर जोरदार टीका केली आहे.
ते म्हणाले, चुंबन घेणे हा गुन्हा आहे काय? चुंबन प्रकरण हे अश्लील प्रकारात मोडते काय? नसेल तर मग शिवसैनिकांच्या घरावर धाडी मारून त्यांना अटक करण्याचे कारण काय? राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारला चुंबनाचे वावडे कधीपासून झाले? असे म्हणत जोरदार निशाणा साधला आहे.

राऊत यांनी ‘सामनाच्या रोखठोक या सदरातून हा हल्लाबोल चढवला आहे. राऊत म्हणाले, राज्यात एक जाहीर चुंबनाचे प्रकरण घडले. त्याने राज्याचे मनोरंजन होत आहे. शिंदे गटाच्या आमदाराने त्यांच्याच महिला पदाधिकाऱ्याचे सार्वजनिक ठिकाणी चुंबन घेतले.
विशेष म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत हा प्रकार घडला. त्याचे लाइव्ह प्रक्षेपणही झाले, त्यानंतर शिवसैनिकांच्या घरावर धाडी मारून त्यांना अटक केली. सध्याच्या काळात प्रत्येक गोष्ट वेगाने सोशल मीडियातून पोहचते त्याला कुणाला दोष देणार? असा सवाल करतानाच मुळात चुंबन घेणे हा गुन्हा आहे का? यावर निर्णय व्हायला पाहिजे, असेही ते म्हणाले.
आधीही राऊत म्हणाले होते की, तुम्ही मुका घ्या नाही तर मिठ्या मारा. आम्हाला का टार्गेट करत आहात? आमच्या कार्यकर्त्यांना का अटक केली जात आहे? तुम्ही मुके घेतले, तुम्हीच निस्तरा. त्याच्याशी आम्हाला घेणंदेणं नाही, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे. यामुळे सध्या याची चर्चा सुरू आहे.