Sharad Pawar : एखाद्या राजकीय पक्षाला लोकसभा किंवा विधानसभा निवडणुकीत चार किंवा त्याहून अधिक राज्यांमध्ये किमान सहा टक्के मते मिळाल्यास तो ‘राष्ट्रीय पक्ष’ म्हणून ओळखला जातो. असे असताना आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या बाबतीत एक मोठी बातमी समोर आली आहे.
यामुळे सध्या याची चर्चा सुरू झाली आहे. शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या ‘राष्ट्रीय पक्ष’ या दर्जाचा फेरआढावा घेण्याच्या प्रक्रियेत निवडणूक आयोगाने मंगळवारी आणखी एक पाऊल पुढे टाकले.
यामुळे राष्ट्रवादीला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादीचा हा दर्जा कायम ठेवावा का, याचा आढावा निवडणूक आयोग घेत असून, मंगळवारी पक्षाच्या नेत्यांना बोलावून त्यांची बाजू ऐकून घेण्यात आली आहे.
याबाबत एखाद्या पक्षाला लोकसभेच्या किमान चार जागा जिंकणे आवश्यक असते. राष्ट्रवादी काँग्रेस आता या दर्जाच्या अटीत बसत नाही. कारण या पक्षाचा एकूण मतटक्का दोन ते अडीच टक्क्यांच्या आसपास आला आहे. राष्ट्रवादी व भाकपसह चार पक्षांवर त्यांचा ‘राष्ट्रीय’ दर्जा गमावण्याची टांगती तलवार आहे.
राष्ट्रवादीच्या वतीने खासदार प्रफुल्ल पटेल व अन्य काही नेत्यांनी आयोगाच्या अशोका रस्त्यावरील मुख्यालयात हजेरी लावल्याचे सांगण्यात आले. २०१९मध्ये राष्ट्रवादीसह मायावती यांचा बसप, भारतीय कम्युनिस्ट पक्ष व तृणमूल काँग्रेस यांनाही सुनावणीसाठी समन्स बजावले होते. याबाबत राष्ट्रवादीकडून अजून काही माहिती समोर आली नाही.