ऐकलंत का, गोविंद बागेत जेवणाला नक्की या…! आपल्याच घरात पुतण्याला बनवला पाहुणा, अजितदादांना शरद पवार यांनी दिले जेवणाचे आमंत्रण

Tejas B Shelar
Published:
Sharad Pawar Invite Ajit Pawar For Lunch

Sharad Pawar Invite Ajit Pawar For Lunch : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडली आहे. अजित दादा पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस मधून एक्झिट घेतली असून त्यांनी शिंदे-फडणवीस सरकारसोबत सोयरीक जमवली आहे. दरम्यान जेव्हापासून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडली आहे तेव्हापासून शरदचंद्र पवार यांच्या गटाकडून आणि अजित दादा यांच्या गटाकडून एकमेकांवर आरोप प्रत्यारोप सुरू आहेत.

राजकारणाचे चाणक्य समजले जाणारे शरद पवार हे मात्र राष्ट्रवादीत उभी फूट पडल्यानंतर देखील पक्षाला नवीन उभारणी देण्यासाठी प्रयत्नरत आहेत. खरे तर शरद पवार हे कोणत्या वेळी कोणता डाव टाकतील आणि विरोधकांना चितपट करतील हे काही सांगता येत नाही.

असं म्हणतात की, शरद पवार यांच्या प्रत्येक निर्णयामागे काही ना काही ठोस कारण असतं. राजकीय शत्रूंना कसं नमवायचं हे पवार यांना चांगलंच ठाऊक आहे. दरम्यान शरदचंद्रजी पवार यांनी नुकताच एक मोठा डाव टाकला आहे. त्यांनी चक्क त्यांच्या पुतण्याला अर्थातच राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनाच जेवणाचे आमंत्रण पाठवले आहे.

स्वतःच्याच घरात पुतण्याला पाहुणा बनवले आहे. त्यामुळे सध्या शरदचंद्रजी पवार यांच्या या गुगलीची संपूर्ण राज्यभर चर्चा पाहायला मिळत आहे. दरम्यान आता आपण हे संपूर्ण प्रकरण नेमके काय आहे हे थोडक्यात समजून घेणार आहोत तसेच शरद पवार यांनी पाठवलेले निमंत्रण पत्रात पवार यांनी काय म्हटले आहे हे देखील आज आपण पाहणार आहोत.

काय आहे संपूर्ण प्रकरण ? 

मिळालेल्या माहितीनुसार, उद्या अर्थातच 2 मार्चला वर्तमान शिंदे-फडणवीस-पवार सरकारच्या वतीने शरद पवार यांच्या बालेकिल्ल्यात अर्थातच बारामतीमध्ये नमो महारोजगार मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं आहे. विशेष म्हणजे आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा महारोजगार मेळावा अधिक भव्य बनवण्यासाठी सरकारने कंबर कसली आहे.

या कार्यक्रमाला खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची हजेरी राहणार आहे. शिवाय, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. दरम्यान, हीच संधी लक्षात घेऊन शरद पवार यांनी एक मोठा राजकीय डाव टाकला आहे.

त्यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नावाने निमंत्रण पत्र पाठवत मुख्यमंत्री महोदय समवेत उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जेवणाचे आमंत्रण दिले आहे. यामुळे सध्या या निमंत्रण पत्राची संपूर्ण महाराष्ट्रभर चर्चा आहे.

शरद पवार हे सहज म्हणून कोणतीच गोष्ट करत नाहीत. त्यांच्या प्रत्येकच गोष्टी मागे काही ना काही राजकीय हेतू असतोच. त्यामुळे सध्या गोविंद बागेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना जेवणासाठी पाठवण्यात आलेल्या निमंत्रणामागे नेमकी काय शाळा सुरु आहे ? याबाबत राज्याच्या राजकीय वर्तुळात विविध चर्चा रंगल्या आहेत.

राज्यसभा खासदार शरद चंद्रजी पवार यांनी मुख्यमंत्री महोदय यांना पाठवलेले पत्र जसंच्या तस 

शरद पवार

संसद सदस्य (राज्य सभा)

 

दि. २८ फेब्रुवारी, २०२४

 

प्रिय मा. मुख्यमंत्री

 

स.न.वि.वि.

 

आपण शनिवार, दिनांक ०२ मार्च, २०२४ रोजी बारामती येथे शासकीय दौऱ्यानिमित्त येत असल्याचे समजले. सदर शासकीय कार्यक्रमाप्रसंगी संसद सदस्य नात्याने मला आणि सौ. सुप्रिया सुळे यांना उपस्थित राहायला आवडेल. तसेच उक्त दिनी महारोजगार मेळाव्याचे आयोजन मी संस्थापक अध्यक्ष असलेल्या विद्या प्रतिष्ठान, विद्यानगरी बारामती येथील मैदानात करण्यात येत असल्याने संस्थेचा अध्यक्ष या नात्याने मी आपले संस्थेच्या प्रांगणात यथोचित स्वागत करू इच्छितो. करीता विद्या प्रतिष्ठान, विद्यानगरी, बारामती येथील अतिथी निवासात चहापानासाठी आपणास निमंत्रीत करतो.

 

आपण मुख्यमंत्री पदी विराजमान झाल्यानंतर बारामती शहरी प्रथमतः येत आहात याचा मला मनोमन आनंद आहे. बारामती येथील ‘गोविंदबाग ह्या माझ्या निवासस्थानी अतिथ्य भोजनाचा आस्वाद घ्यावा असे मी आपणास दूरध्वनीवरून निमंत्रण यापूर्वीच दिले आहे. कृपया नमो महारोजगार मेळाव्यानंतर आपण मंत्रीमंडळातील इतर सहकाऱ्यांसह ह्या निमंत्रणाचा देखील आपण स्विकार करावा.

 

दोन्ही सस्नेह आमंत्रणांचा आपण स्विकार कराल अशी अपेक्षा व्यक्त करतो. धन्यवाद. कळावे,

 

आपला.

(शरद पवार )

 

श्री. एकनाथ संभाजीराव शिंदे

माननिय मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य,

मंत्रालय, मुंबई-३२.

 

प्रतिलिपी – खालील मान्यवरांना विनंती कि आपणास देखील सस्नेह निमंत्रीत करीत असून कृपया निमंत्रणाचा स्विकार करावा.

 

१. श्री. देवेंद्र गंगाधरराव फडणवीस,

माननिय उपमुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य,

मंत्रालय, मुंबई-३२.

 

२. श्री. अजित अनंतराव पवार

माननिय उपमुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य,

मंत्रालय, मुंबई-३२.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe