Maharashtra Politics : उपमुख्यमंत्री अजित पवार आणि त्यांच्यासोबत गेलेले बहुतांश नेते केंद्रीय तपास यंत्रणांच्या दबावामुळे बाहेर गेले आहेत. तरीही भाजपसोबत गेलेल्या अजित पवार आणि इतर नेत्यांना पक्षात पुन्हा स्थान दिले जाणार नाही.
याबाबत माझी भूमिका स्पष्ट आहे, असे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी मंगळवारी केले.
बिल्कीस बानोच्या आरोपींना माफ करण्याचा गुजरात सरकारने घेतलेला निर्णय सर्वोच्च न्यायालयाने रद्द केला. यासंदर्भात शरद पवार यांनी मुंबईतील प्रदेश कार्यालयात पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी पवार बोलत होते.
शरद पवार म्हणाले, बिल्कीस बानो प्रकरणातील सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाने सर्वसामान्यांना दिलासा मिळाला आहे. कोर्टाच्या निर्णयाचे मी स्वागत करतो. सर्वोच्च न्यायालयाने त्यांच्या निकालात हा अधिकार महाराष्ट्र सरकारचा असल्याचे सांगत गुजरात सरकारने महाराष्ट्र सरकारच्या अधिकारावर अतिक्रमण केल्याचे म्हटले आहे.
त्यामुळे महाराष्ट्र सरकारने हे प्रकरण गांभीर्याने घ्यावे आणि याप्रकरणी राजकीय हस्तक्षेप करू न देण्याची जबाबदारी घ्यावी, असे पवार म्हणाले. ‘इंडिया’ आघाडीत वंचितला सोबत घ्यावे, अशी आमची स्पष्ट भूमिका आहे. जागावाटपात संबंधित ठिकाणी कोणत्या पक्षाची किती संघटनात्मक ताकद आहे,
कोणत्या उमेदवाराने संबंधित जागा लढवली तर जास्त मते मिळतील, या आधारावर जागावाटप करताना विचार करावा, अशी माझी भूमिका आहे. राष्ट्रवादीला ८ ते ९ जागा मिळतील, असेही ते म्हणाले. केंद्रीय तपास यंत्रणांकडून आमदार रोहित पवार, रवींद्र वायकर यांच्यासह विरोधकांवर होत असलेल्या कारवाया आणि धाडीबाबत विचारले असता ते म्हणाले की, केंद्रातील सरकार जोपर्यंत बदलत नाही, तोवर विरोधी पक्षातील नेत्यांवर कारवाई होत राहणार आणि धाडी पडत राहतील.
राजकीय निवृत्तीवरून अजित पवारांना उत्तर
वय वर्षे ८४ झाले तरी थांबायचे नाव घेत नाहीत, अशी टीका उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपले काका शरद पवार यांच्यावर केली होती. त्याबाबत विचारले असता शरद पवार म्हणाले, कुणी काय बोलावे हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे.
मात्र प्रश्न वयाचा आणि कार्यक्षमतेबद्दलचा असेल तर अनेकांची उदाहरणे देता येतील. वयाच्या ८३ व्या वर्षी मोरारजी देसाई पंतप्रधान होते. त्यांचे वय झाले तरी ते काम करत होते. त्यांच्या मागे जनतेचे बहुमत होते. त्यामुळे कुणाचे वय वगैरे काढण्याच्या भानगडीत कोणी पडू नये.