शरद पवारांनी द्रौपदी मुर्मूंना पाठिंबा द्यावा; नवनीत राणांची विनंती

Published on -

मुंबई :  राष्ट्रपतीपदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू आज मुंबई दौऱ्यावर आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सुद्धा त्यांना पाठिंबा जाहीर करावा, अशी विनंती खासदार नवनीत राणा यांनी केली आहे. याबाबत नवनीत राणा यांनी सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे.

ज्येष्ठ नेते शरद पवार यांना सुद्धा माझी विंनती आहे की त्यांनीही द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा द्यावा, त्यामुळे आदिवासी समाजात विश्वासाची भावना निर्माण होईल असं नवनीत राणा म्हणाल्या आहेत.

शरद पवार महाराष्ट्रातील ज्येष्ठ नेते आहेत. त्यांना पाहून, त्यांच्याकडून प्रेरणा घेत अनेक जण काम करतात. आदिवासींना आज सगळ्यांची समर्थनाची गरज आहे. पहिल्यांदा आज आदिवासी समाजातून तळागळातून काम करुन एक महिला वर आली आहे. त्या भाजपच्या उमेदवार आहेत किंवा त्यांना मोदीजींनी समर्थन दिला आहे, हा विचार न करता त्या कोणत्या समाजातून येतात आणि किती धडपड करुन त्या इथे आल्या आहेत. त्या समाजाच्या पाठिशी आपण सगळे आहोत, हा विश्वास देण्यासाठी मी पवार साहेबांना विनंती करते की, त्यांनी आपल्या सगळ्या आमदार आणि खासदारांचे समर्थन द्यावे, अशी विनंती नवनीत राणा यांनी शरद पवारांना केली आहे.

दरम्यान, द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा दिल्याबद्दल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे अभिनंदन आणि धन्यवाद करत उद्धव ठाकरेंचा निर्णय हा खासदारांच्या दबावातच झालेला आहे, असा खोचक टोलाही नवनीत राणा यांनी लगावला आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe