Shashikant Pawar : मराठा आरक्षणासाठी प्राणपणाने लढणारे नेते अखिल भारतीय मराठा महासंघाचे अध्यक्ष शशिकांत पवार यांचे निधन झाले. मराठा समाजाच्या उन्नतीसाठी आणि मराठा आरक्षणासाठी सातत्याने त्यांची धडपड सुरू होती. कोकणातून परत येत असताना संध्याकाळी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.
त्याच्या निधनाने मराठा चळवळीतील एक हुशार व संयमी नेता गमावला असल्याची भावना व्यक्त होत आहे. यामुळे समाजाचे मोठे नुकसान होणार आहे. बहुजनांची नेहमी बाजू घेणारे अशीही त्यांची ओळख होती. मराठ्यांना ओबीसी कोट्यातून आरक्षण मिळावे या मताचे ते होते.

त्यासाठी या वयातही आंदोलन केले व आंदोलन प्रखर करण्याचा इरादा त्यांनी यापूर्वीच जाहीर केला होता. त्यांची अंत्ययात्रा 11 वाजता दादर येथील त्यांच्या निवासस्थानाहून निघणार आहे. त्यांच्यामागे पत्नी तसेच वीरेंद्र व योगेश पवार हे दोन मुलगे, एक मुलगी, सुना, जावई, नातवंडे असा मोठा परिवार आहे.
दरम्यान, रत्नागिरी मराठा बिझनसमेन फोरमच्या बैठकीसाठी ते मुंबईहून तेथे गेले होते. तेथून परत येताना वाटेतच त्यांना पाली परिसरात हृदयविकाराचा झटका आला. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र त्यांचे निधन झाले.
मराठा महासंघात दोन वर्षांपूर्वी फूट पडल्याने त्यांना मोठा मनस्ताप झाला होता. त्यांनी याबाबत अनेकदा बोलून दाखवले होते. ते सतत विवंचनेत होते. मात्र त्यातूनही सावरून पुन्हा त्यांनी संघटना बांधणीचे काम सुरु केले होते. अनेक ठिकाणी ते जात होते.