बंडखोरांविरोधात शिवसेनेची कठोर कारवाई; संतोष बांगर, तानाजी सावतांना पहिला फटका

मुंबई : शिवसेनेच्या ४० आमदारांनी बंडखोरी केल्यामुळे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रिपदाचा त्याग करावा लागला. आमदारांच्या या बंडखोरीनंतर शिवसेनेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे असे दोन गट पडले आहेत. ठाकरेंकडून बंडखोर आमदारांना यापूर्वी अनेकवेळा परतण्याचे आवाहन करण्यात आले आहे. मात्र आमदार परत न आल्यामुळे आता शिवसेनेने कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली आहे.

शिवसेनेचे बंडखोर आमदार संतोष बांगर यांची जिल्हा प्रमुखपदावरुन तर तानाजी सावंत यांची जिल्हा संपर्कप्रमुख पदावरुन हकालपट्टी करण्यात आली आहे. शिवसेनेच्या कठोर कारवाईचा पहिला फटका संतोष बांगर आणि तानाजी सावंत यांना बसला आहे.

आमदार संतोष बांगर यांनी विश्वासदर्शक ठराव सादर करताना ऐनवेळी शिंदे गटात सामील होण्याचा निर्णय घेतला. त्यांनी ऐनवेळी त्यांनी बंडखोरी केल्यामुळे शिवसेना पक्षप्रमुखांनी त्यांच्यावर नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर आता त्यांची हिंगोलीच्या जिल्हाप्रमुख पदावरुन हकालपट्टी करण्यात आली आहे.

सोलापूरमधील आमदार तानाजी सावंत यांच्याविरोधतही शिवसेनेने कठोर कारवाई केली आहे. सावंत हेदेखील बंडखोर आमदारांसोबत गुवाहाटीमध्ये मुक्कामी होते. याच कारणामुळे तानाजी सावंत यांना सोलापूर संपर्कप्रमुख पदावरुन हटवण्यात आले आहे.