राज्यात सर्वात गाजलेल्या लाडकी बहिण योजनेची चर्चा अजूनही सुरुच आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत महायुती सरकारने लाडक्या बहिणींना दिल्या जाणाऱ्या 1500 रुपयांच्या हप्त्यात वाढ करुन आपण 2100 रुपये करु असे आश्वासन दिले होते. त्यानंतर लाडक्या बहिणींनी महायुती सरकारवर मतांचा वर्षाव केला आणि, महायुती सरकार दुसऱ्यांदा सत्तेवर बसले. मात्र अजूनही महायुती सरकारने 2100 रुपयांचे दिलेले आश्वासन पूर्ण केलेले नाही. त्यात आता एक धक्कादायक बातमी समोर आली आहे.
लाडक्या बहिणींचा अपेक्षाभंग
सत्तेवर आल्यावर लाडक्या बहिणींचा हप्ता वाढवून तो 2100 रुपये करु असे आश्वासन महायुती सरकारमधील तिन्ही पक्षांनी दिले होते. मात्र सत्तेवर आल्यानंतर महायुती सरकारने या आश्वासनाबाबत चालढकल सुरु केल्याचे दिसत आहे. वेगवेगळ्या कार्यक्रमात महायुतीचे नेते फक्त वेळ मारुन नेताना दिसत आहेत. आता महायुती सरकारमधील मंत्र्यांनीच 2100 रुपये होण्याची अद्याप स्थिती नाही, असं सांगितलं आहे. या प्रकारामुळे लाडक्या बहिणींचा अपेक्षाभंग झाला आहे.

काय म्हणाले मंत्री?
राज्याचे सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाठ यांनी नुकतेच एका कार्यक्रमात एक विधान केले. ते म्हणाले, राज्याची आर्थिक कशी बसवायची, हा वरिष्ठ पातळीवरील विषय आहे. पण 1500 चे 2100 करु शकत नाही ही वस्तुस्थिती आहे. अनेक जण लाडकी बहीण योजनेबाबत बाऊ करतात. ही योजना बंद होणार का? असा प्रश्न विचारतात. पसंतु तसं काही नाही. त्या योजनेला आम्ही पैसे देणार आहोत. तो आमचा शब्द आहे आणि आम्ही तो पूर्ण करणार आहोत.’ असं शिरसाट यांनी स्पष्ट केलं.
निधी वळविल्याचा आरोप
मंत्री शिरसाट यांनी याच योजनेबाबत गेल्या आठवड्यात एक तक्रार केली होती. लाडकी बहीण योजनेसाठी निधी अपुरा पडत असल्यानं आदिवासी विकास, सामाजिक न्याय विभागांचा निधी महिला आणि बालकल्याण खात्याकडे वळवला जात आहे, असं मंत्री शिरसाठ यांचा आरोप होता. त्याबद्दलही शिरसाट यांनी नाराजीही व्यक्त केली होती. लाडकी बहीण योजनेसंदर्भात फेब्रुवारीमध्ये माझ्याकडे फाईल आलेली होती. तेव्हा मी त्यात स्पष्टपणे उल्लेख केलेला आहे की आपण या खात्यातून अल्पसंख्याक, दलित, या घटकांना सुविधा देतोय. त्यामुळे या खात्यांच्या निधीत कपात करु नये. माझ्या खात्यातील निधी कमी करु नये किंवा वळता करु नये, असं फाईलवर स्पष्टपणे सांगितलेलं आहे,’ असं शिरसाट यांनी म्हटलं होतं.
2100 रुपयांचं कवित्व संपेना
महायुतीचे मंत्री संजय शिरसाठ यांनी या बाबात अर्थमंत्री अजित पवार यांच्यावर अप्रत्यक्ष निशाणा साधला होता. त्यानंतर राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ यांनीही शिरसाठ यांच्या या प्रतिक्रियेला उत्तर दिलं होतं. म्हणजेच महायुतीतील घटकपक्षांमध्येच 2100 रुपयांच्या व लाडक्या बहिणींच्या निधीच्या मुद्यांवरुन तू-तू मै-मै सुरु आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींना वाढीव 2100 रुपये मिळण्यासाठी वाट पहावी लागणार आहे.