Ahmednagar News : गणेश कारखाना निवडणुकीवेळी सत्ता समीकरणे बदलली, राजकीय विरोधक देखील एकत्रित आल्याचे दिसले. परिणामी गणेशमध्ये विखे यांना मोठी हार पत्करावी लागली. कोल्हे-थोरातांचे वर्चस्व तेथे पाहायला मिळाले.
दरम्यान आता कारखान्याच्या सभासदांना साखर वाटप करण्यात आल्यानंतर पुन्हा राजकारण तापले आहे. कारखान्याचे माजी चेअरमन मुकुंदराव सदाफळ यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कोल्हे – थोरातांना मोठे आवाहन दिले आहे.

साखर वाटपावरून टीका करताना ते म्हणाले, साखर वाटपातून फक्त सभासदांचे लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न झालाय. डॉ. विखे पाटील कारखान्याप्रमाणे उच्चांकी भाव देऊन गणेश कारखान्याच्या सभासदांना आनंद तुम्ही देऊन दाखवला पाहिजे.
बंद पडलेला गणेश कारखाना ज्यांनी वाऱ्यावर सोडला त्यांना आता आम्ही आनंद निर्माण करायला आलोय असे म्हणण्याचा कोणाताही अधिकार नसल्याचा घणाघात सदाफळ यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केलाय.
* बंद पडलेला कारखाना मंत्री विखे पाटील यांच्यामुळेच सुरू
या पत्रकात त्यांनी पुन्हा एकदा इतिहासात डोकावत म्हटलंय की कारखाना बंद पडला तेव्हा हेच नेते गणेश परिसराला दुखः देऊन गेले होते, विखे यांनी सुस्थितीत कारखाना आणला व आता हे या सुस्थितीतील कारखान्याच्या जिवावर उड्या मारत आहेत.
पण बंद पडलेला कारखाना मंत्री विखे पाटील यांच्यामुळे सुरू होऊ शकला, अन्यथा खासगी माणसाच्या ताब्यात गेला असता तर तुम्हाला निवडणुकही लढवता आल्या नसत्या हे वास्तव असल्याचे त्यांनी म्हटलं आहे.
* कोल्हे – थोरातांवर टीका
दरम्यान त्यांनी प्रसिद्धी पत्रकात हा कारखाना कसा चालवणार, संगमनेर आणि संजीवनी किती गुंतवणूक करणार यावर कोणीच बोलत नसून तुम्ही तर बंद पडलेला कारखाना सोडून निघून गेला होता, तेव्हा कोल्हे पॅटर्न राबवून कारखाना सुरू करण्याची संधी असतांनाही तुम्ही मात्र कारखान्यापेक्षा उसावर डोळा ठेवला होता असा घणाघात केला आहे.
तसेच ते पत्रकाच्या शेवटी म्हणाले की, केवळ साखर वाटप करून काही होनार नाही, तुम्ही उच्चांकी भाव देऊन सभासदांना आनंद देऊन दाखवा. मंत्री विखे पाटील यांनी प्रवरेच्या बरोबरीने गणेश परिसरातील ऊस उत्पादकांना भाव देऊन खरा आनंद निर्माण केलाय असे ते म्हणाले.