Shrigonda News : गेल्या काही दिवसांपासून श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघ चर्चेत आहे. खरे तर हा मतदारसंघ भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते बबनराव पाचपुते यांचा बालेकिल्ला.
मात्र आजारपणामुळे यंदाची विधानसभा निवडणूक बबनराव पाचपुते लढवणार नाही येत. परंतु भारतीय जनता पक्षाने यावेळीही पाचपुते कुटुंबातच उमेदवारी दिलेली आहे.

श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघात यावेळी भारतीय जनता पक्षाने विद्यमान आमदार बबनराव पाचपुते यांच्या धर्मपत्नी सौ प्रतिभा पाचपुते यांना उमेदवारी दिली आहे. महत्वाचे म्हणजे प्रतिभा पाचपुते यांनी या जागेसाठी आपला उमेदवारी अर्ज कधीच भरला आहे.
पण, त्या आणि त्यांचे पती विद्यमान आमदार बबनराव पाचपुते हे आपल्या लेकाच्या उमेदवारीसाठी आग्रही आहेत. विक्रमसिंह पाचपुते यांना उमेदवारी मिळावी यासाठी उमेदवारीची घोषणा झाल्यानंतर लगेचच बबनराव पाचपुते यांनी सहपत्नीक जाऊन भाजप पक्ष श्रेष्ठींची मुंबईत भेट घेतली होती.
पण, भाजप पक्षश्रेष्ठी प्रतिभा पाचपुते यांच्याच उमेदवारीवर ठाम आहेत. मात्र आता प्रतिभा पाचपुते आणि बबनराव पाचपुते पुन्हा एकदा विक्रमसिंह पाचपुते यांना उमेदवारी मिळावी यासाठी फिल्डिंग लावताना दिसत आहेत.
या अनुषंगाने उद्या पाचपुते दांपत्य राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार असल्याची खात्रीलायक बातमी समोर आली आहे. खरे तर उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी आता फक्त दोन दिवसांचा काळ बाकी राहिला आहे.
4 नोव्हेंबर हा उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठीचा शेवटचा दिवस आहे. तत्पूर्वी भारतीय जनता पक्षाच्या अधिकृत उमेदवार प्रतिभा पाचेपुते यांनी उमेदवारी बाबत आपली भूमिका जाहीर केली आहे. यामुळे मात्र भारतीय जनता पक्षातील वरिष्ठांची चिंता वाढणार असे दिसते.
प्रतिभा पाचपुते यांनी आपण पुन्हा एकदा पक्षाकडे उमेदवार बदलण्याची मागणी करणार असून जर पक्षश्रेष्ठींनी आपल्या मागणीवर सकारात्मक निर्णय घेतला नाही तर उमेदवारी अर्ज मागे घेऊ अशी भूमिका जाहीर केली आहे.
यावेळी भाजपाच्या उमेदवार प्रतिभा पाचपुते यांनी, ‘गेली पाच वर्ष पाचपुते साहेब आजारी असल्यानं मुंबईची कामं विक्रम पाहत होता. विक्रम कामं पाहायचा आणि साहेब आमदार म्हणून असायचे. तर, मला वाटतं तोच कामं पाहतो तर तोच आमदार का नाही ?
जर तो स्वत: आमदार असेल तर चागंलं काम करु शकेल. माझं तिकीट जाहीर झाल्यानंतर फडणवीस साहेबांना विक्रमला तिकीट द्या असं सांगायला गेले होते. मात्र, त्यांनी सांगितलं की आता फिक्स झालंय तुम्हीच उभं राहा.
मुंबईहून आल्यावर मी प्रचाराला सुरुवात केली. प्रचाराला सुरुवात केल्यानंतर बाहेर राहावं लागायचं. त्यामुळं कळत नकळत पाचपुते साहेबांकडे दुर्लक्ष व्हायला लागलं. आमच्याकडे केअरटेकर आहे, पण त्याच्याकडून साहेबांचं एकदा दोनदा औषध चुकलं होतं.
त्यामुळं माझं पत्नी म्हणून कर्तव्य आहे की पहिलं साहेबांची तब्येत आणि नंतर आमदारकी’, असं म्हणत प्रतिभा पाचपुते यांनी पुन्हा एकदा आपल्या लेकाला उमेदवारी मिळावी अशी मागणी केली आहे. आपण 1984 पासून आमदारांची पत्नी आहोत, आता आमदाराची आई व्हायला काय हरकत आहे ? अशी भावना भाजपाच्या उमेदवार प्रतिभा पाचपुते यांनी यावेळी बोलून दाखवली.
दरम्यान जर पक्षाने विक्रमसिंह पाचपुते यांना तिकीट दिले नाही तर आपण उमेदवारी अर्ज मागे घेऊ असा इशारा देखील प्रतिभा पाचपुते यांनी यावेळी दिला आहे. ज्येष्ठ नेते विद्यमान आमदार बबनराव पाचपुते यांच्या तब्येतीचे कारण देत प्रतिभा पाचपुते यांच्याकडून उमेदवार बदलाची मागणी उपस्थित करण्यात आली आहे.
यामुळे आता भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून या संदर्भात काय निर्णय घेतला जातो याकडे श्रीगोंदा सहित संपूर्ण नगर जिल्ह्याचे किंबहुना संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून राहणार आहे.