विद्यमान आमदार बबनराव पाचपुते यांचे सुपुत्र विक्रमदादा रिंगणात, कार्यकर्त्यांमध्ये जल्लोष; प्रतिभा पाचपुते म्हणतात, फक्त तिकिटासाठी…..

Shrigonda News

Shrigonda News : श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघात महायुतीकडून भारतीय जनता पक्षाने विद्यमान आमदार बबनराव पाचपुते यांच्या धर्मपत्नी सौ प्रतिभा पाचपुते यांना उमेदवारी जाहीर केली होती. मात्र पाचपुते दांपत्य त्यांच्या लेकाच्या उमेदवारीसाठी आग्रही होते.

यामुळे उमेदवारी जाहीर झाल्यानंतर प्रतिभा पाचपुते यांच्या समवेत त्यांचे सुपुत्र विक्रमसिंह पाचपुते यांनी देखील उमेदवारी अर्ज भरला होता. दरम्यान अर्ज माघारी घेण्याच्या शेवटच्या दिवशी प्रतिभा पाचपुते यांनी आपला अर्ज मागे घेतला.

म्हणजे आता विक्रमसिंह पाचपुते हेच भारतीय जनता पक्षाचे अधिकृत उमेदवार राहणार आहेत. दरम्यान विक्रमदादा निवडणुकीच्या रिंगणात उतरताच पाचपुते कुटुंबांच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष केला आहे. पाचपुते यांच्या माऊली निवासस्थानासमोर जल्लोष करीत कार्यकर्त्यांनी विक्रम पाचपुते यांच्या उमेदवारीचे स्वागत केले आहे.

यावेळी भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष बाळासाहेब महाडीक यांनी कार्यकर्त्यांच्या भावना व्यक्त केल्यात. ते म्हणालेत की, विक्रमसिंह पाचपुते हे वडाचे रोपटे असून आज त्याचे रोपण झाले आहे. आता या रोपट्याचे वटवृक्षात रूपांतर होणार आहे.

भाजपचे तालुकाध्यक्ष संदीप नागवडे म्हणालेत की, बबनराव पाचपुते हे आजारी होते. त्याकाळात विक्रमसिंह यांनी विकासकामांची धुरा खांद्यावर घेऊन कोट्यवधी रुपयांचा निधी मंजूर करून आणलाय. विक्रमसिंह यांच्या रुपाने मतदारसंघाला विकासाची दूरदृष्टी असणारा नेता आणि युवा आमदार मिळणार आहे.

नागवडे साखर कारखान्याचे माजी उपाध्यक्ष ज्ञानदेव हिरवे यांनी याप्रसंगी बोलताना सध्याचे युग हे युवकांचे, नवतरुणांचे आहे. यामुळे विक्रमसिंह यांना मिळालेली उमेदवारी ही युवकांचा सन्मान म्हणून पाहिली जात आहे. हा युवा मतदारांचा सन्मान आहे. आता खऱ्या अर्थाने युवकांनी या संधीचे सोने करण्याची आवश्यकता आहे, अशी प्रतिक्रिया दिली.

विक्रमसिंह पाचपुते म्हणतात…
श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघाचे भारतीय जनता पक्षाचे अधिकृत उमेदवार विक्रमसिंह पाचपुते यांनी मी उमेदवार नसून श्रीगोंदा मतदारसंघातील प्रत्येक मतदारराजा हा उमेदवार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वातील शिंदे फडणवीस पवार सरकारने श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघाला नेहमीच झुकते माप दिलेले आहे.

त्यामुळे येथील मतदार महायुती सरकारला विसरणार नाहीत. यावेळी विद्यमान आमदार बबनराव पाचपुते यांनी देखील आपले मनोगत व्यक्त केले. तसेच विक्रमसिंह पाचपुते यांच्या मातोश्री प्रतिभा पाचपुते यांनीही आपल्या लेकाला उमेदवारी सुटल्यानंतर प्रतिक्रिया दिली आहे.

प्रतिभा पाचपुते काय म्हणतात ?
प्रतिभा पाचपुते यांनी याप्रसंगी बोलताना असे म्हटले आहे की, आमदार बबनराव पाचपुते यांनी केलेले काम आणि पक्षाचा विश्वास यामुळे पक्षश्रेष्ठींनी मला घरपोच तिकीट पाठवले. पण मी स्वतःहून आजारपणात पतीची सेवा करता यावी म्हणून तिकीट विक्रम सिंह ला देण्यात यावे अशी मागणी केली होती.

दरम्यान ही मागणी पक्षश्रेष्ठींनी मान्य केली. पण फक्त तिकिटासाठी सहा महिन्यात तीन पक्ष बदलण्याची नामुष्की आपल्यावर ओढावली नसल्याची टीका देखील यावेळी प्रतिभा पाचपुते यांनी विरोधकांवर केली आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe