भाजप बबनराव पाचपुते यांच्या मुलाला नाही तर पत्नीला उमेदवारी देणार; मविआकडून जगताप यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब शक्य, कोण ठरणार वरचढ ?

भारतीय जनता पक्षाने पुन्हा एकदा पाचपुते कुटुंबावर विश्वास दाखवला तर अजितदादा गटात समाविष्ट असणाऱ्या अनुराधा नागवडे नेमकी काय भूमिका घेणार हे देखील पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. महाविकास आघाडी बाबत बोलायचं झालं तर महाविकास आघाडीमध्ये समाविष्ट असणाऱ्या तिन्ही घटक पक्षांमधील नेते या जागेसाठी इच्छुक आहेत.

Tejas B Shelar
Published:
Shrigonda Politics

Shrigonda Politics : अहिल्यानगर जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण पूर्णपणे ढवळून निघाले आहे. लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला नगर जिल्ह्यात चांगली कामगिरी करता आली असल्याने महाविकास आघाडी कमालीच्या फॉर्ममध्ये आहे. दुसरीकडे महायुतीने गेल्या लोकसभेच्या निवडणुकीतून धडा घेत विधानसभेच्या निवडणुकीकडे आपले पूर्ण लक्ष केंद्रित केले आहे.

लोकसभा निवडणुकीत ज्या चुका झाल्यात त्या चुका आगामी विधानसभा निवडणुकीत होणार नाहीत यासाठी महायुतीने कंबर कसली आहे. अशातच श्रीगोंदा मधून एक मोठी अपडेट समोर आली आहे. श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघाचे भाजपाचे विद्यमान आमदार बबनराव पाचपुते हे यंदा वैद्यकीय कारणांमुळे स्वतः निवडणूक लढवणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. दरम्यान पक्षाने बबनराव पाचपुते यांचे पुत्र विक्रम आणि बबनराव पाचपुते यांची पत्नी डॉक्टर प्रतिभा पाचपुते यांच्या उमेदवारीची चाचपणी केली.

यामध्ये मात्र विक्रम पाचपुते यांच्या विरोधात कमालीची नाराजी असल्याचे निष्पन्न झाले असून भारतीय जनता पक्ष प्रतिभा पाचपुते यांना उमेदवारी जाहीर करू शकते असे चित्र आहे. याशिवाय, गेल्या दहा ते पंधरा वर्षांपासून भाजपासोबत एकनिष्ठ असणाऱ्या सुवर्णा पाचपुते यादेखील उमेदवारीच्या रेसमध्ये आहेत. सुवर्णा पाचपुते यांचा जनाधार हा फार मोठा आहे. यामुळे विक्रम पाचपुते यांच्यापेक्षा सुवर्णा पाचपुते यांना उमेदवारी दिल्यास पक्षाला अधिक फायदा होणार असे मत काही कार्यकर्त्यांनी व्यक्त केले आहे.

खरंतर श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघासाठी राज्य शासनाने भरघोस निधी उपलब्ध करून दिला आहे. मात्र, कामे वाटप करताना सरसकट दहा टक्के कमिशन पाचपुते यांच्या पुत्रांकडून जमा करण्यात आला असल्याचा आरोप काही लोकांकडून करण्यात आला आहे. मध्यंतरी बबनराव पाचपुते यांचे पुतणे, शिवसेनेचे उपनेते साजन पाचपुते यांनी देखील या टक्केवारीचा उल्लेख केला होता. त्यामुळे विक्रम पाचपुते यांच्या विरोधात सर्वसामान्य नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात नाराजी आहे.

हेच कारण आहे की बबनराव पाचपुते यांचा मुलगा विक्रम यांच्या ऐवजी डॉक्टर प्रतिभा पाचपुते यांना उमेदवारी देण्यासाठी पक्षाने अनुकूल भूमिका घेतलेली दिसते. दुसरीकडे, महायुतीमध्ये समाविष्ट असणाऱ्या अजितदादा गटातील अनुराधा नागवडे यादेखील येथून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत. त्यामुळे या जागेवर महायुतीचा उमेदवार कोण असेल? याबाबत विविध चर्चांना उधाण आले आहे.

तसेच भारतीय जनता पक्षाने पुन्हा एकदा पाचपुते कुटुंबावर विश्वास दाखवला तर अजितदादा गटात समाविष्ट असणाऱ्या अनुराधा नागवडे नेमकी काय भूमिका घेणार हे देखील पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. महाविकास आघाडी बाबत बोलायचं झालं तर महाविकास आघाडीमध्ये समाविष्ट असणाऱ्या तिन्ही घटक पक्षांमधील नेते या जागेसाठी इच्छुक आहेत.

काँग्रेसकडून घनश्याम शेलार, ठाकरे गटाकडून साजन पाचपुते आणि शरद पवार गटाकडून राहुल जगताप हे या रेस मध्ये आहेत. मात्र या सगळ्यांमध्ये राहुल जगतापांचे पारडे थोडेसे जड दिसत आहे. गेले काही दिवस जगताप हे बॅकफूटवर होते. मात्र सध्या ते फ्रंट सीटवर आहेत अन टॉपस्पीडने उमेदवारीच्या रेसमध्ये आगे कूच करताना दिसत आहेत.

शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष शिर्के यांनी ही जागा शरद पवार गटाकडेच राहिला आणि येथून राहुल जगताप हेच उमेदवार असतील अशी घोषणा सुद्धा केली आहे. दरम्यान, राजकीय विश्लेषकांनी राहुल जगताप यांना जर उमेदवारी मिळाली तर ते इतर उमेदवारांना सरस भरतील असा दावा केला आहे.

जगतापांच्या मागे युवकांचे फार मोठे संघटन काम करते. युवकांना जगताप यांचे नेतृत्व विशेष आवडत आहे. मतदार संघात त्यांच्या पत्नीचे अर्थातच प्रणिती यांचा देखील जनसंपर्क खूपच मोठा आहे. या बाजू जगतापांसाठी जमेच्या आहेत. शरद पवार यांचा मतदार संघावर असणारा प्रभाव देखील जगतापांच्याचं कामाचा ठरणार आहे.

यामुळे जर समजा महाविकास आघाडी मधील काँग्रेस आणि ठाकरे गटातील इच्छुकांनी अडथळा आणला नाही आणि जर जगताप विरुद्ध पाचपुते अशी लढत झाली किंवा जगताप-नागवडे-पाचपुते अशी तिरंगी लढत झाली तर जगताप दोन्ही परिस्थितींमध्ये वरचढ ठरू शकतात असा दावा राजकारणातील जाणकार करत आहेत.

यामुळे श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडी आणि महायुतीकडून कोणाच्या गळ्यात उमेदवारीची माळ पडणार आणि इथून कोण विजयी पताका फडकवणार हे पाहणे विशेष उत्सुकतेचे राहील.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe