Shrigonda Politics : श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघ हा महाराष्ट्रातील एक चर्चेतला मतदारसंघ. या निवडणुकीत देखील श्रीगोंद्याची मोठी चर्चा सुरू आहे. हा मतदारसंघ विद्यमान आमदार बबनराव पाचपुते यांचा बालेकिल्ला समजला जातो.
या गडाला सुरंग लावणे म्हणजे सोपी गोष्ट नाही. पण, बबनराव पाचपुते हे आजारपणामुळे यंदा निवडणुकीत दिसणार नाहीत. पाचपुते यांचा आजार पण लक्षात घेता यावेळी भाजपाने त्यांच्याऐवजी त्यांच्या धर्मपत्नी प्रतिभा पाचपुते यांना उमेदवारी दिलेली आहे.
प्रतिभा पाचपुते यांनी येथून आपला उमेदवारी अर्ज भरला असून त्यांच्या विरोधात महाविकास आघाडी कडून अनुराधा नागवडे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. खरंतर नागवडे हे महायुती मध्ये समाविष्ट असणाऱ्या अजितदादा यांच्या गटात होत्या.
मात्र विधानसभा लढवण्याची महत्त्वाकांक्षा उराशी बाळगून त्यांनी अजित दादा गटाला सोडचिठ्ठी देत आघाडी मधील ठाकरे गटात प्रवेश केला. ठाकरे गटाने त्यांना आता श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघाची उमेदवारी दिली आहे.
खरे तर ही जागा शरद पवार यांच्या गटाला जाईल आणि येथून माजी आमदार राहुल जगताप यांना तिकीट मिळणार असे बोलले जात होते. जगताप देखील आपल्या उमेदवारीच्या बाबतीत शाश्वत होते. मात्र ऐनवेळी महाविकास आघाडीमध्ये ही जागा ठाकरे गटाला गेली आणि येथून नागवडे यांना उमेदवारी देण्यात आली.
यामुळे माजी आमदार राहुल जगताप हे नाराज झाले. त्यांनी समर्थकांचा मेळावा पिंपळगाव पिसा या ठिकाणी घेतला होता त्यावेळी सर्व समर्थकांनी कोणत्याही परिस्थितीमध्ये अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल करायचा असे जाहीर केले होते.
त्यानुसार काल श्रीगोंदा शहरामध्ये भव्य जाहीर सभा व रॅली काढून माजी आमदार राहुल जगताप यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. यावरून श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीत मोठी बिघाडी पाहायला मिळाली असून येथील निवडणूक यंदा बहुरंगी होणार हे नक्की झाले आहे. त्यामुळे श्रीगोंद्याचा निकाल काय लागतोय याकडे साऱ्या महाराष्ट्राचे लक्ष लागून राहणार आहे.