Shrigonda Politics News : श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघ हा एक हाय प्रोफाईल मतदारसंघ आहे. कारण म्हणजे बबनराव पाचपुते. विद्यमान आमदार बबनराव पाचपुते हे सात वेळा श्रीगोंदा चे आमदार राहिले आहेत.
विशेष म्हणजे त्यांनी वेगवेगळ्या पक्षांकडून आमदार होण्याचा बहुमान पटकावला आहे. अर्थातच इथं पक्षापेक्षा नेता महत्त्वाचा राहिला आहे. श्रीगोंदा हा खऱ्या अर्थाने बबनराव पाचपुते यांचा बालेकिल्ला.
यावेळी मात्र आजारपणामुळे विद्यमान आमदार निवडणुकीच्या रिंगणात नाहीत. त्यांच्या ऐवजी त्यांचे सुपुत्र विक्रम पाचपुते हे विधानसभेचा गड राखण्यासाठी सज्ज आहेत. खरंतर आजारपणामुळे विद्यमान आमदार निवडणूक लढवणार नाहीत हे आधीचं स्पष्ट झाले होते.
मात्र असे असले तरी भारतीय जनता पक्षाने पाचपुते कुटुंबालाच उमेदवारी द्यायची असे ठरवले आणि पक्षाने बबनराव पाचपुते यांच्या धर्मपत्नी प्रतिभा पाचपुते यांना उमेदवारी दिली. पण पाचपुते दांपत्य आपल्याला लेकाच्या उमेदवारीसाठी आग्रही होते.
यामुळे उमेदवारी अर्ज सादर करताना प्रतिभा पाचपुते आणि विक्रम पाचपुते दोघांनीही उमेदवारी अर्ज सादर केला. नंतर उमेदवारी मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी प्रतिभा पाचपुते यांनी निवडणुकीतून माघार घेतली. यामुळे ऐनवेळी उमेदवार बदलला असल्याने काही वेगळं चित्र तयार होणार का, याचा फायदा नेमका कोणाला होणार असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.
पण उमेदवार बदलाचा फायदा विरोधकांना होणार नसल्याचे मत काही राजकीय तज्ञ वर्तवत आहेत. बबनरावं पाचपुते यांना मानणारा एक मोठा गट मतदार संघात सक्रिय आहे. यामुळेच त्यांनी सात वेळा श्रीगोंद्याचे प्रतिनिधित्व केले आहे. बबनराव पाचपुते यांच्यासोबत असणारा एकसंघ गट हीच पाचपुते यांची खरी ताकद आहे.
दुसरीकडे विरोधकांमधील दुफळीचा फायदा देखील पाचपुते कुटुंबालाचं होणार आहे. यामुळे सध्या तरी विक्रम पाचपुते हे निवडणुकीत आघाडीवर असल्याचे दिसते. या मतदारसंघात महायुतीकडून भारतीय जनता पक्षाचे विक्रम पाचपुते, महाविकास आघाडी कडून अनुराधा नागवडे, वंचित बहुजन आघाडी कडून अण्णासाहेब शेलार, तर अपक्ष म्हणून माजी आमदार राहुल जगताप व भाजपाच्या सुवर्णा पाचपुते हे निवडणुकीच्या आखाड्यात उतरले आहेत.
खरंतर 2014 ला राहुल जगताप यांनी विद्यमान आमदार बबनराव पाचपुते यांचा पराभव केला होता. दुसरीकडे, 2019 मध्ये म्हणजेच गेल्या निवडणुकीत घनश्याम शेलार यांचा अवघ्या काही मतांनी पराभव झाला अन बबन दादा विजयी झालेत.
यावेळी मात्र निवडणूक बहुरंगी वाटत असली तरी देखील पाचपुते यांच्या पथ्यावर पडत आहे. कारण की 2014 मध्ये जेव्हा बबन दादांचा पराभव झाला त्यावेळी फारच वेगळे समीकरण होते. तसेच, 2019 मध्ये बबनदादांना पाचपुते विरोधक एकत्रित आल्याने विजयासाठी मोठी कसरत करावी लागली होती.
पण यावेळी नागवडे आणि जगताप ही नैसर्गिक युती तुटलेली आहे. घनश्याम शेलार यांनीही ऐनवेळी आपला अर्ज मागे घेतला आहे. यामुळे यंदाची बहुरंगी लढत पाचपुते यांच्यासाठी फायदेशीर ठरणार असे बोलले जात आहे. नागवडे व जगताप दोन्हीही निवडणुकीच्या रिंगणात असल्याने यांच्यात सरळसरळ मत विभागणी दिसून येईल.
अण्णासाहेब शेलार हे कोणाची मते खाणार हा मोठा प्रश्न आहे. काही जाणकार पाचपुते यांची मते अण्णासाहेब शेलार आपल्याकडे खेचून आणू शकतात असे म्हणत आहेत. मात्र यामध्ये पूर्ण सत्यता नाही. कारण की बेलवंडी गटात नागवडे यांची ताकद आहे आणि त्याचठिकाणी अण्णासाहेब शेलार अधिक सेंधमारी करणार आहेत.
म्हणजेच नागवडे यांची मते खाण्याचे काम शेलार करताना दिसतील. श्रीगोंदा शहर, पारगाव, घारगाव, आढळगाव या ठिकाणी पाचपुते यांची देखील मते शेलार आपल्याकडे खेचून आणू शकतात. परंतु जगताप व शेलार यांची दुभंगलेली मैत्री जगताप यांच्यासाठी अधिक अडचणीची ठरण्याची शक्यता आहे.
म्हणजेच अण्णासाहेब शेलार यांचा साऱ्यांनाच थोडा का होईना पण फटका बसणार आहे मात्र याचा पाचपुते फारसा विचार करणार नाहीत. पाचपुते यांच्या मतांवर शेलार यांच्या उमेदवारीमुळे फार अधिक परिणाम होणार नाही.
दुसरीकडे, नेहमीच भाजप विरोधात असणारी मुस्लिम समाजाची मते देखील यावेळी विरोधातील एकालाच मिळणार नाहीयेत. म्हणजेच याचाही फायदा अप्रत्यक्षरीत्या पाचपुते यांनाच होणार आहे. दुसरीकडे पाचपुते यांचा पाच वर्षातील गट हा एकसंघ आहे, यामुळे या निवडणुकीत पाचपुते यांचेच पारडे जड दिसते. तथापि 23 तारखेला श्रीगोंद्याचा नवा आमदार कोण असेल हे स्पष्ट होणार आहे.