राज्य सरकारने सुरू केलेल्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी ज्या महिलांचे अर्ज भरायचे राहिले असतील, ज्यांच्या अर्जात काही त्रुटी राहिल्या असतील, त्यांनी काळजी करण्याचे कारण नाही.
या योजनेच्या अर्जासाठी ३१ ऑगस्टपर्यंत मुदत असली तरी सप्टेंबरपर्यंत अर्ज आलेल्या महिलांनाही या योजनेचा लाभ मिळणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले.
स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून गुरुवारी कुळगाव बदलापूर नगर परिषदेच्या नव्या प्रशासकीय इमारतीचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. याप्रसंगी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, सुरेश ऊर्फ बाळ्यामामा म्हात्रे, आमदार किसन कथोरे, डॉ. बालाजी किणीकर, ज्ञानेश्वर म्हात्रे, जिल्हाधिकारी अशोक शिनगारे,
माजी नगराध्यक्ष वामन म्हात्रे आदी व्यासपीठावर उपस्थित होते. लोकार्पणानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपस्थितांशी संवाद साधला. यापूर्वीच्या अडीच वर्षांच्या सरकारने केलेली कामे व आताच्या सरकारने गेल्या दोन वर्षांत केलेली कामे यांची तुलना केली तर आमच्या सरकारने किती वेगवान कामे केली ते लक्षात येईल, असे सांगून नामोल्लेख न करता माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली.
ते पुढे म्हणाले की, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांच्या खात्यावर १७ तारखेपर्यंत ३ हजार रुपये जमा होतील, असे जाहीर करण्यात आले होते. मात्र, त्याआधीच ३३ लाख महिलांच्या खात्यावर ही रक्कम जमा झाली आहे. १७ तारखेपर्यंत उर्वरित लाभार्थ्यांच्या खात्यातही रक्कम जमा होणार आहे.
कोट्यवधींत लोळणाऱ्यांना दीड हजार रुपयांचे मोल नाही. मात्र, कुटुंब चालवताना आईला करावी लागणारी कसरत मी पाहिली आहे. त्यामुळे त्या दीड हजार रुपयांचे मोल मी जाणतो, असा टोलाही त्यांनी विरोधकांना लगावला. आमची देना बँक आहे, त्यांची लेना बँक होती.
आधीचे सरकार हप्ते घेणारे सरकार होते, पण आमचे सरकार योजनांचे पैसे बँक खात्यात भरणारे सरकार आहे, असे सांगून हे लाडकं सरकार लक्षात ठेवा, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले. राज्य सरकारने महिलांसाठी १०७ योजना केल्या आहेत.
मुख्यमंत्री लाडका भाऊ योजना, मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजना, मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना, मुलींसाठी मोफत उच्च शिक्षण, मुख्यमंत्री स्वयंरोजगार योजना, शेतकरी कृषी पंप योजना, ज्येष्ठ नागरिकांसाठी वयोश्री योजना, मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना अशा अनेक योजना सर्वसामान्य नागरिकांसाठी राज्य सरकारने सुरू केल्या आहेत.
या सर्व योजना कायमस्वरूपी सुरू राहणाऱ्या असल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. मी शब्द पाळणारा भाऊ आहे. आतापर्यंत मला एक सख्खी बहीण होती; परंतु आता लाखो, कोट्यवधी सख्ख्या लाडक्या बहिणी आणि भाऊही आहेत, अशा भावनाही मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केल्या.