Ahmednagar Politics : सोयीनुसार राजकारण करण्याची आ. थोरात यांची नीती संपूर्ण राज्याने पाहिली आहे. एकीकडे काँग्रेसचा निष्ठावान म्हणून मिरवून घ्यायचे आणि दुसरीकडे स्वतःच्या राजकीय फायद्यासाठी भाजपाच्या नेत्यांबरोबर हातमिळवणी करायची, तेव्हा भारतीय जनता पक्ष त्यांना अडचणीचा वाटत नाही. अशी टीका भाजपाचे संगमनेर शहराध्यक्ष ऍड. श्रीराम गणपुले यांनी माजी महसूलमंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांच्यावर केली आहे.
नुकतीच आमदार थोरात यांनी भारतीय जनता पक्षामुळे उपमुख्यमंत्री फडणवीस अडचणीत आल्याचे वक्तव्य केले होते. त्यावर भाजपाचे संगमनेर शहराध्यक्ष ऍड. श्रीराम गणपुले यांनी माजी महसूलमंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांच्यावर चांगलीच टीका केली असून ते म्हणाले कि, आमचे नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची एवढीच काळजी असेल, तर तुम्ही भाजपमध्ये येऊन त्यांची अडचण दूर करण्याचा प्रयत्न करा.
म्हणजे तुमचाही मार्ग मोकळा होईल, असा उपरोधिक सल्ला देत आ. थोरात यांना थेट भाजपामध्येच येण्याचे आवाहन केले आहे. सोयीनुसार राजकारण करण्याची आ. थोरात यांची नीती संपूर्ण राज्याने पाहिली आहे. एकीकडे काँग्रेसचा निष्ठावान म्हणून मिरवून घ्यायचे आणि दुसरीकडे स्वतःच्या राजकीय फायद्यासाठी भाजपाच्या नेत्यांबरोबर हातमिळवणी करायची, तेव्हा भारतीय जनता पक्ष त्यांना अडचणीचा वाटत नाही.
स्वतःचा भाचा अपक्ष म्हणून उभा करायचा, त्याच्यासाठी भाजपाचा पाठींबा घ्यायचा, शिक्षक मतदारसंघात महाविकास आघाडीच्या उमेदवाराविरुद्ध अपक्ष उमेदवार उभा करायचा, त्याला सर्व रसद पुरवायची.
सगे-सोयऱ्यांचे राजकारण करुन जिल्ह्यात व पक्षात वजन असल्याचा खोटा आव आणायचा, हे करणाऱ्या आ. थोरातांनी आपल्या पक्षाची दुर्दशा सुधारण्याचा प्रामाणिक प्रयत्न करण्याचे सोडून ना. फडणवीस आणि भारतीय जनता पक्ष यांची काळजी करणे चुकीचे असल्याची टीका गणपुले यांनी केली.
ना. फडणवीसांना आ. थोरातांच्या दाखल्याची अथवा सहानुभूतीची गरज नाही. ते कट्टर विचाराधारेशी बांधील असलेले नेते आहेत. हे त्यांनी त्यांच्या २०१४ पासूनच्या कर्तबगारीने सिद्ध केले आहे. पक्ष देईल ती जबाबदारी आणि पक्ष ठरवेल ती पूर्व दिशा मानणाऱ्या कार्यकर्त्यांच्या परंपरेतल्या ना. फडणवीस यांना आ. थोरातांच्या प्रेमाची गरज नसल्याचे गणपुले यांनी म्हटले आहे.