Ahmednagar News : ज्यांना कुणी नाही, अशा बांधकाम क्षेत्रातील असंघटित कामगार बंधू भगिनींसाठी ११ वर्षांपूर्वी जनशक्ती श्रमिक संघटना स्थापन केली. कामगारांचे विविध प्रश्नांसाठी अहोरात्र काम करणारी आमची संघटना तालुक्यात काम करत आहे.
काही लोकांना मात्र निवडणूक आली की कामगारांची आठवण होते व त्यांचे दुकान ते मांडतात. निवडणूक संपली की पाच वर्षे परत दुकान बंद असते. असा काहींचा धंदा असल्याचे प्रतिपादन जि. प. सदस्या सौ. हर्षदा काकडे यांनी शेवगाव येथे केले.
आज दि. (२७) रोजी जनशक्ती श्रमिक संघटनेच्या वतीने १२० बांधकाम कामगारांना गृहोपयोगी साहित्यांचे वाटप करण्यात आले. या वेळी त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी जनशक्ती उद्योग आघाडीचे अध्यक्ष अशोक ढाकणे होते.
कार्यक्रमास अॅड. शिवाजीराव काकडे, जगन्नाथ गावडे, राजू जिजा पातकळ, संतोष गायकवाड, भगवान डावरे, बबनराव लबडे, श्रीम. मंदाकिनी पुरनाळे, बाळू गोरे, हरिभाऊ नजन, राजेंद्र लोणकर, आबासाहेब काकडे, राजेंद्र पोटफोडे, भारत लांडे, भिवसेन केदार, विष्णू दिवटे, रघुनाथ सातपुते, रवींद्र कर्डिले, भारत भालेराव, नामदेव ढाकणे आदींची प्रमुख उपस्थिती होती.
पुढे बोलताना सौ. काकडे म्हणाल्या की, कै. आबासाहेब काकडे व कै. डॉ.टी. के. पुरनाळे यांच्याकडून समाजसेवेचा वसा घेतलेला आहे. राजकारण हा आमचा धंदा नाही. आमच्याकडे कोणतीही तालुक्याची मोठी सत्ता नसताना देखील गोरगरिब, कष्टकरी, सर्वसामान्यांची सेवा आम्ही अहोरात्र करत आहोत.
गेल्या ११ वर्षांपासून असंघटित कामगारांना तालुक्यात एकत्र करून त्यांच्यासाठी आमचा लढा चालू आहे. प्रत्येक वर्षी काही ना योजना शासनाकडून आणून त्यांना मिळवून देण्याचा प्रयत्न असतो. परंतु काही लोकांना निवडणुका आल्या की, कामगारांची आठवण येते.
निवडणुक संपल्या की, कामगारांचा विषय पुन्हा संपतो. आम्ही निवडणुकीपुरते काम करत नाहीत. आमचे काम पक्ष विरहित सतत चालू असते. ज्यांना कोणीच नाही त्यांच्यासाठी जनशक्ती सदैव काम करते. यापुढे जास्तीत जास्त बांधकाम कामगारांना घरकुल योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचेही सौ. काकडे बोलतांना म्हणाल्या.
या वेळी अॅड. शिवाजीराव काकडे, जगन्नाथ गावडे, विष्णू दिवटे, बबनराव लबडे यांची भाषणे झाली. सूत्रसंचालन श्रमिक संघाचे अध्यक्ष संजय दुधाडे यांनी केले. उपाध्यक्ष भारत लांडे यांनी आभार मानले.