Ahilyanagar News : अहिल्यानगर – गोदावरी खोऱ्यातील पाण्याची तूट दूर करून दुष्काळमुक्त महाराष्ट्र घडवण्यासाठी नदीजोड प्रकल्पाला गती देणे हे राज्य सरकारचे प्रमुख धोरण आहे. केंद्र आणि राज्यात जनतेच्या अपेक्षांना साजेसे सरकार कार्यरत असून, लोककल्याणकारी निर्णयांमुळे विकासाला वेग आला आहे, असे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी नमूद केले.
श्रीरामपूर तालुक्यातील पढेगाव येथे ग्रामपंचायतीने आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात मंत्री विखे पाटील बोलत होते. यावेळी लोकनेते पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील वाचनालयाचे उद्घाटन त्यांच्या हस्ते झाले. ग्रामस्थांनी पुस्तक तुला करून मंत्री विखे पाटील यांचा सत्कार केला.

मोदींच्या निर्णयांमुळे देशाची प्रगती
मंत्री विखे पाटील म्हणाले की, गेल्या दहा वर्षांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदृष्टीच्या निर्णयांमुळे देशाने प्रगती साधली, आणि जनतेने त्यांना तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची संधी दिली. लोकसभा निवडणुकीत काहींनी खोटा प्रचार करून जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला, परंतु पंतप्रधान मोदी यांनी संविधानाचा सन्मान राखत संविधान दिन साजरा करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला. पढेगाव ग्रामपंचायतीने सुरू केलेले वाचनालय ज्ञानप्रसाराचे केंद्र बनावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
नदीजोड प्रकल्पाला भरीव निधी
श्रीरामपूर तालुक्यातील लाख कालव्याच्या दुरुस्तीसाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्य सरकारने दुष्काळमुक्त महाराष्ट्राचा संकल्प सोडला आहे. भंडारदारा धरणात अतिरिक्त पाणीसाठा निर्माण करणे आणि मुळा धरणातील गाळ काढून त्याची क्षमता वाढवणे यासारख्या कामांना गती देण्यात येत आहे. नदीजोड प्रकल्प पूर्ण करण्यासाठी निधीची कमतरता जाणवू दिली जाणार नाही, असे आश्वासन विखे पाटील यांनी दिले.
या प्रसंगी नानासाहेब शिंदे, दीपक पटारे, भाजपा तालुकाध्यक्ष बाबासाहेब चेडे, सरपंच किशोर बनकर, सरपंच महेश खरात, सरपंच पुष्पा भोसले, भेर्डापूर सोसायटीचे चेअरमन भगीरथ तनपुरे, बाळासाहेब तोरणे, किसनराव बंगाळ, संभाजी कुंदे, प्रविण लिप्टे, नितिन भुजबळ, महंमद शेख, सलिम तांबोळी, दत्तात्रय गिरमे, सचिन तोरणे यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामस्थ उपस्थित होते.