Sujay Vikhe News : येत्या काही दिवसांनी विधानसभेच्या निवडणुकांचा थरार रंगणार आहे. दरम्यान विधानसभेचा आखाडा सजण्यापूर्वीच या आखाड्याचे पैलवान अंगाला माती लावून उभे आहेत. खरे तर पुढल्या महिन्यात अर्थातच ऑक्टोबर मध्ये विधानसभेच्या निवडणुकांच्या तारखा जाहीर होणार असे दिसत आहे.
या अनुषंगाने महायुती आणि महाविकास आघाडी या दोन्ही गटांमध्ये जागा वाटपावरून बंद दाराआड चर्चासत्र सुरू असल्याचे चित्र आहे. राज्यातील सर्व मतदारसंघांमध्ये आता नेत्यांचे दौरे वाढले आहेत. सर्वच राजकीय पक्षांचे नेते मेळावे, बैठका आणि जाहीर सभांच्या माध्यमातून आगामी निवडणुकीची तयारी करत आहेत.
या जाहीर सभांच्या माध्यमातून प्रचाराला आताच सुरुवात झाली आहे. यामुळे संपूर्ण राज्यभर सध्या राजकीय वातावरण पूर्णपणे तापलेले आहे. इच्छुक उमेदवार दंड थोपटत आहेत. प्रत्येक विधानसभा मतदारसंघांमध्ये इच्छुकांची संख्या वाढत आहे. अहमदनगर जिल्ह्यातही अशीच परिस्थिती आहे.
अशातच जिल्ह्यातील राहुरी विधानसभा मतदारसंघातून आत्ताच्या घडीची सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. भारतीय जनता पक्षाचे माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांनी राहुरी मतदार संघातून यंदाही निवडणूक लढवण्याची इच्छा बोलून दाखवली आहे.
खरे तर गेल्या निवडणुकीत अर्थातच 2019 च्या निवडणुकीत शिवाजीराव कर्डिले यांचा या जागेवरून पराभव झाला होता. राष्ट्रवादीचे प्राजक्त तनपुरे यांनी कर्डिले यांचा पराभव केला होता. यावेळी मात्र कर्डिले या पराभवाचा वचपा करण्यासाठी सज्ज झाले आहेत. त्यांनी राहुरी मधून निवडणूक लढवणार अशी घोषणा केली आहे.
कर्डिले यांनी एक पत्रकार परिषद आयोजित करून राहुरी मतदार संघातील जनतेनेच मला येथून निवडणूक लढवण्याचा आग्रह केला असल्याचे म्हणत आपण येथूनच निवडणूक लढवणार असे जाहीर केले आहे. आम्ही आपणास सांगू इच्छितो की, गेल्या काही दिवसांपासून नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार सुजय विखे पाटील हे यावेळी विधानसभेच्या रिंगणात उतरणार अशा चर्चा सुरू आहेत.
सुजय विखे पाटील राहुरी विधानसभा मतदारसंघातून आपले नशीब आजमावणार असे बोलले जात आहे. मध्यंतरी, सुजय विखे पाटील यांनी राहुरी मधून निवडणूक लढवली तर कर्डिले यांना श्रीगोंद्यातून तिकीट दिले जाऊ शकते असे देखील म्हटले जात होते. मात्र कर्डिले यांनी आपण राहुरी मधूनच निवडणूक लढवणार असे स्पष्ट केले आहे. त्यामुळे यंदाची निवडणूक माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले विरुद्ध प्राजक्त तनपुरे यांच्यामध्ये होणार असे दिसत आहे.
कर्डिले यांनी आपली भूमिका स्पष्ट केली असल्याने माजी खासदार सुजय विखे पाटील आता कोणत्या मतदारसंघातून निवडणूक लढवणार हे पाहण्यासारखे ठरणार आहे. पण, कर्डिले यांच्या या भूमिकेमुळे महायुतीमध्ये वादाची ठिणगी देखील पडण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे, राहुरी विधानसभा मतदारसंघातून महायुतीचा उमेदवार कोण राहील अन कर्डिले यांच्या या भूमिकेमुळे महायुतीमध्ये वादाची ठिणगी पडणार का? हे पाहणे विशेष उत्सुकतेचे ठरेल.