Cotton Rate Maharashtra : कापूस हे महाराष्ट्रासहित देशभरातील अनेक राज्यांमध्ये उत्पादित होणारे एक महत्त्वाचे पीक. शेतकरी बांधव या पिकाला पांढर सोनं म्हणून ओळखतात. महाराष्ट्रातील कापूस शेती बाबत बोलायचं झालं तर या पिकाची लागवड राज्यातील मराठवाडा, विदर्भ आणि खांदेश सहित मध्य महाराष्ट्रातील काही मोजक्या जिल्ह्यांमध्ये लागवड केली जाते. राज्यातील बहुतांशी शेतकऱ्यांचे या पिकावर अर्थकारण अवलंबून आहे.
मात्र गेल्या दोन वर्षांपासून कापसाला बाजारात अपेक्षित भाव मिळत नसल्याची वास्तविकता आहे. हेच कारण आहे की कापूस उत्पादक शेतकऱ्यांना गत दोन हंगामात मोठे नुकसान सहन करावे लागले आहे. मात्र असे असले तरी यंदाही कापसाची मोठ्या प्रमाणात लागवड करण्यात आली आहे.

महत्वाचे म्हणजे यंदाच्या हंगामातील कापूस आता बाजारात दाखलही झाला आहे. नुकत्याच काही दिवसांपूर्वी खानदेशातील जळगाव जिल्ह्यात कापूस खरेदीचा श्री गणेशा झाला होता. आता खेतिया बाजार समितीमध्ये देखील कापूस खरेदीला सुरुवात करण्यात आली आहे.
सोमवारी या बाजारात कापूस खरेदीचा श्री गणेशा झाला असून मुहूर्ताच्या कापसाला 7 हजार 700 रुपये प्रति क्विंटल असा दर मिळाला आहे. पहिल्या दिवशी या बाजारात 120 क्विंटल कापसाची खरेदी करण्यात आली.
कापूस खरेदी सुरू होणार असे कळताच या बाजारात शेतकऱ्यांच्या वाहनांची वर्दळ सुरू झाली. या बाजारात पहिली बोली झोतवाडे (महाराष्ट्र) येथील शेतकरी मनोज सुकदेव सदाराव यांच्या कापसाला लागली.
मनोज सुखदेव सदाराव यांच्या कापसाला ७,५०१ रुपये प्रतिक्विंटल भाव देण्यात आला आहे. या बाजारात मुहूर्ताच्या कापसाला कमाल 7 हजार 700 रुपये, सरासरी 7200 आणि किमान 5,050 असा भाव मिळाला आहे.
यावेळी बाजार समितीमध्ये सोळा वाहनातून 120 क्विंटल कापसाची आवक झाली होती. खरंतर सध्या ज्या शेतकऱ्यांनी कापसाची लवकर लागवड केली होती त्या शेतकऱ्यांचा कापूस काढणीसाठी तयार झाला असून हाच कापूस आता बाजारात विक्रीसाठी दाखल होत आहे.
दरवर्षी कापसाची सप्टेंबर महिन्यात आवक सुरू होते. मात्र विजयादशमीपासून खऱ्या अर्थाने आवक वाढते. यावर्षीही विजयादशमीपासून कापसाची आवक वाढणार आहे. यामुळे जेव्हा कापसाची विक्रमी आवक होईल त्यावेळी कापसाला काय दर मिळणार हे पाहण्यासारखे ठरणार आहे.