Sujay Vikhe On Loksabha Nivdnuk : नुकत्याच काही महिन्यांपूर्वी पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत अहमदनगर जिल्ह्यातील नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात मोठा उलटफेर झाला. या निवडणुकीत निलेश लंके यांनी महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे सुपुत्र डॉक्टर सुजय विखे पाटील यांचा पराभव केला.
हा पराभव माजी खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या जिव्हारी लागला आहे. त्यांनी अनेकदा आपल्या पराभवावर भाष्य केले आहे. दरम्यान, पाथर्डी तालुक्यातील चिंचोडी येथे वांबोरी चारी टप्पा दोन च्या उद्घाटन सोहळ्याप्रसंगी बोलताना सुजय विखे पाटील यांनी आपल्या पराभवावर पुन्हा एकदा भाष्य केले.
यावेळी त्यांनी आपल्या स्व पक्षातील नेत्यांना देखील काम पिचक्या दिल्यात. सुजय विखे पाटील यांनी माजी आमदार तथा मंत्री शिवाजी कर्डिले यांचे नाव घेत आपल्या पराभवाची खदखद पुन्हा एकदा बोलून दाखवली.
डॉक्टर विखे म्हणालेत की विकास कामे करूनही मी पराभूत झालो. या पराभवाची अनेकांनी अनेक कारणे सांगितलीत. पण, या कारणांच्या खोलात शिरायला गेलोत तर माजी आमदार तथा मंत्री शिवाजी कर्डिले यांची सुद्धा पंचायत होईल.
त्यामुळे सध्या तरी या विषयावर बोलायला नको असे म्हणत सुजय विखे पाटील यांनी आपल्या पराभवाची खदखद बोलून दाखवली आणि आपल्या स्व पक्षातील नेत्यांना देखील पराभवावरून कानपिचक्या दिल्यात. यावेळी सुजय विखे पाटील यांनी त्यांनी केलेल्या विकास कामांचा पाढाही वाचला.
ते म्हणालेत की दोन दशकांपासून म्हणजेच वीस वर्षांपासून रखडलेला अहमदनगर उड्डाणपुल, नगर करमाळा रस्ता, नगर पाथर्डी हायवे, वांबोरी चारीचे पाणी मढीपर्यंत नेणे अशी सुमारे दहा हजार कोटी रुपयांची विकास कामे केल्याचा दावा सुजय विखे पाटील यांनी केला.
पुढे डॉक्टर विखे पाटील यांनी जेव्हा राजकारणात जात धर्म तेव्हा विकासाच्या रस्त्यात बाधा येते. विकास कामे करण्यासाठी तीस वर्षे लागतात त्यासाठी जात धर्म बाजूला ठेवा असे आवाहन देखील त्यांनी यावेळी केले.
दिलेले आश्वासन खरे करणारा माणूस
मी दिलेले आश्वासन खरे करणारा माणूस आहे. पाथर्डी व आजूबाजूच्या परिसराने विखे घराण्याला खूप दिले आहे. यामुळे या भागासाठी आपणही काहीतरी देणे लागतो. यामुळे आपण पुढेही या भागासाठी विकास कामे करतच राहणार असे आश्वासन यावेळी डॉक्टर विखे पाटील यांनी दिले.