शिर्डीतील दुहेरी हत्याकांडानंतर शहरात कायदा-सुव्यवस्था प्रस्थापित करण्यासाठी वेगवेगळ्या उपाययोजना केल्या जात आहेत. परिणामी, आता अतिक्रमण काढण्याची मोहीम प्रभावीपणे राबवली जात आहे, बेघरांसाठी निवास व्यवस्थेवर भर दिला जात आहे, तसेच साईभक्तांच्या सुरक्षिततेसाठी प्रशासन सक्रिय झाले आहे.
साईभक्तांकडून अनावश्यक शुल्क आकारणे, फसवणूक, चुकीचे व्यवहार, तसेच अवाजवी किमती लावणे या प्रकारांना आळा घालण्यासाठी दुकानदारांसाठी नवीन नियमावली तयार केली जाणार आहे. या नियमानुसार, साईभक्तांची कोणतीही आर्थिक लूट होणार नाही, तसेच शहरातील व्यापारी संघटनांनी ग्राहकहिताच्या दृष्टीने काम करणे आवश्यक ठरणार आहे.

माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी शिर्डीत पत्रकारांशी संवाद साधताना सांगितले की, शहरातील अवैध धंदे, दारू अड्डे, मटका, पॉलिसी आणि अवैध वाहतूक यावर पोलीस कारवाई करत आहेत.
साईभक्तांच्या सुरक्षिततेसाठी आणि शहरातील नियमांचे पालन करण्यासाठी निर्माण झालेल्या बेशिस्त व्यवस्थेवर कारवाई सुरू असून, त्यावर राजकारण करणे योग्य नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
शिर्डी शहरातील 11 नंबर चारीवरील अतिक्रमण हटवण्यास विरोध करणारे मंडळी न्यायालयात गेले होते, मात्र न्यायालयाने स्थगिती उठवल्यानंतर त्यांनी पुढील पाठपुरावा केला नाही.
प्रशासकीय यंत्रणांनी नियमांचे पालन करत अतिक्रमण हटवले आहे. याशिवाय, निमगाव निघोज ग्रामसभेने विरोध केल्यामुळे गट नंबर 401 मध्ये बेघरांसाठी जागा देता आली नाही, त्यामुळे आता गट नंबर 276 मध्ये जागा देण्याचा विचार सुरू आहे.
दुहेरी हत्याकांडानंतर सुरू झालेल्या सुधारणा मोहिमेचे सकारात्मक परिणाम दिसू लागले आहेत. प्रशासकीय यंत्रणा शहरात सुव्यवस्था निर्माण करण्यासाठी सातत्याने कार्यरत आहे. भविष्यात साईभक्तांच्या सुरक्षिततेसाठी आणि अतिक्रमण रोखण्यासाठी अधिक कठोर पावले उचलली जातील, असे डॉ. सुजय विखे पाटील यांनी सांगितले.