Sujay Vikhe Patil : लोणीव्यंकनाथ (ता. श्रीगोंदे) येथील एका कार्यक्रमात भाजप आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते यांच्यात बाचाबाची झाल्याचे समोर आले आहे. खासदार डॅा. सुजय विखे पाटील यांच्या प्रयत्नातून होत असलेल्या कामांचे भूमिपूजन झाले. या कार्यक्रमात खासदार विखे यांच्यासमोर राडा झाला.
यामुळे याठिकाणी काही काळ तणाव होता. दोन्ही गटातील कार्यकर्त्यांचे तुफान शाब्दीक युद्ध झाले. या प्रकरणात खासदार विखे यांनी हस्तक्षेप करुन वाद मिटवला. ते म्हणाले, विकासाचा प्रश्न आहे. कार्यकर्त्यांना मने मोकळे होण्याची जागा नसल्याने अशा कार्यकर्त्यांना संधी मिळते.

तसेच ते म्हणाले, सगळे आपलेच कार्यकर्ते आहेत. यापुर्वी जिल्हा परिषदेची निवडणूक झाली असती तर सगळे म्यूट म्हणजे मूक दिसले असते. थोड्या दिवस थांबा श्रीगोंद्यातही तेच दिसणार आहे, असा सूचक इशारा देखील त्यांनी दिला आहे.
लोणीव्यंकनाथ येथील रेल्वे गेट परिसरातील तीन किलोमीटर अंतराचे काम रखडले आहे. या कामासाठी साडेतीन कोटींचा निधी विखे पाटील यांच्या प्रयत्नातून मंजूर झाला. यावेळी आमदार बबनराव पाचपुते, गणपतराव काकडे, भगवानराव पाचपुते आदी यावेळी उपस्थित होते.
दरम्यान, राष्ट्रवादीचे नेते राज्य बाजार समिती महासंघाचे अध्यक्ष बाळासाहेब नाहाटा यांनी विखे यांचे कौतुक केले. नंतर काकडे यांनी त्यांच्या भाषणात राष्ट्रवादीच्या नेत्यांबद्दल अपशब्द काढले. यामुळे हा वाद वाढत गेला.