Ahmednagar Politics : टाकळी ढोकेश्वर येथील अंतर्गत रस्त्याच्या कामासाठी खासदार डॉ. सुजय विखे यांनी पाठपुरावा केला, निधी आणला. असे असताना जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुजित झावरे आपणच रस्त्यासाठी निधी आणल्याचा वल्गना करीत आहेत.
तुम्ही कोणत्याही पदावर नाहीत, जिल्हा परिषदेचे सदस्य नाहीत. मग निधी आणल्याचा बढाया कशाला मारता, असा सवाल भाजपचे ज्येष्ठ नेते डॉ. भाऊसाहेब खिलारी यांनी झावरे यांना केला.

पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर गावांतर्गत बाजारतळ ते बांडेवस्ती ते वासुंदे या रस्त्याच्या ३० लाख रुपये खर्चाच्या कामाचे काशिनाथ दाते, भाजपचे तालुकाध्यक्ष राहुल शिंदे, विश्वनाथ कोरडे यांच्यासह भाजपच्या विविध पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत भूमिपूजन पार पडले.
त्यावेळी डॉ. खिलारी यांनी झावरे यांना लक्ष्य केले. हे काम सुजित झावरे यांनी मंजूर केले असून इतरांना श्रेय घेण्याचा अधिकार नसल्याचे झावरे समर्थकांनी यापूर्वी स्पष्ट केले होते. त्यावरून भाजप कार्यकर्ते व झावरे समर्थकांमध्ये कलगीतुरा रंगला आहे.
डॉ. खिलारी म्हणाले, बऱ्याच वर्षांपासून या रस्त्याचे काम प्रलंबित होते. काशिनाथ दाते, राहुल शिंदे तसेच ग्रामस्थांनी खासदार डॉ. सुजय विखे यांच्याकडे या कामाची मागणी केली होती.
टाकळी ढोकेश्वर गावासह या तालुक्यावर विखे घराण्याचे मोठे प्रेम राहिलेले आहे. आतापर्यंत जे जे मागितले, ते काम तत्कालीन खासदार बाळासाहेब विखे, मंत्री राधाकृष्ण विखे यांनी केले आहे.
या कामाचे श्रेय खासदार विखे यांचेच असल्याचे डॉ. खिलारी म्हणाले. कोणत्याही पदावर नसलेले निधी दिल्याचे सांगतात. टाकळी ढोकेश्वर गावात हस्तक्षेप करण्याचा त्यांचा काडीचाही संबंध नाही.
आम्ही निधी आणण्यासाठी सक्षम आहोत. इतरांनी लुडबूड करू नये. आपण पदावर असताना आपण टाकळी ढोकेश्वर येथे कोणती कामे केली हे स्पष्ट करावे, असे आवाहन माजी सरपंच शिवाजी खिलारी यांनी सुजित झावरे यांना केले.
यावेळी शिवसेनेचे तालुकाप्रमुख विकास रोहोकले, खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष बाबासाहेब खिलारी, माजी सरपंच शिवाजी खिलारी, बबनराव पायमोडे, नारायण झावरे, विलास झावरे, बापूसाहेब रांधवन, शुभम गोरडे, अप्पासाहेब झावरे, मल्हारी धुमाळ, रवी पायमोडे, संजय झावरे, अक्षय गोरडे, सुशांत लोंढे आदी उपस्थित होते.