अहिल्यानगर- शिवसेनेत वर्षानुवर्षे राजकीय घडामोडी झाल्या, अनेक नेते बाहेर पडले, काहींनी पक्षांतर केले, तर काहींनी तात्पुरता विराम घेतला. मात्र, आता हे सर्व जण पुन्हा एकत्र आले आहेत.
मूळ शिवसेनेपासून वेगळे झालेले आणि अलिकडच्या फूटीनंतर आणखी तुकड्या-तुकड्यांत विभागले गेलेले शिवसैनिक शिंदे गट आणि महायुतीच्या माध्यमातून एकत्र येत आहेत.

कधीकाळी परस्परांवर आरोप-प्रत्यारोप करणारे हे नेते आता शिंदे गटात एकत्र आले आहेत. मूळ शिवसेना, नंतर ठाकरे गट आणि त्यानंतर पक्षांतर करत वेगवेगळ्या दिशांना गेलेल्या या नेत्यांचे आता एकत्रिकरण होत आहे. त्यांच्या या नव्या एकजुटीमुळे महापालिका निवडणुकीत काय परिणाम होणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
शहराच्या राजकारणात एकेकाळी अनिल राठोड यांचे मोठे वर्चस्व होते. त्याच काळात, शिवसेना सत्तेत असतानाही पक्षांतर्गत फूट पडली. त्या वेळी तत्कालीन शहरप्रमुख गणेश भोसले, किशोर डागवाले, दीपक सूळ यांच्यासह ११ नगरसेवकांनी शिवसेनेला सोडचिठ्ठी दिली. हे नेते वेगवेगळ्या पक्षांमध्ये स्थिरावले, काहीजण राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) आणि भाजपमध्ये गेले. आता ते महायुतीत असल्याने अप्रत्यक्षरित्या पुन्हा एकत्र आले आहेत.
यानंतर अंबादास पंधाडे, संजय चोपडा, सुभाष लोंढे यांनी शिवसेना सोडली. काहींनी काँग्रेस, तर काहींनी इतर पक्षांचा आधार घेतला. सुभाष लोंढे काँग्रेसमध्ये जाऊन पुन्हा शिवसेनेत परतले आणि आता शिंदे गटात आहेत. संजय चोपडा राष्ट्रवादीत गेले. तीन वर्षांपूर्वी शिवसेनेत फूट पडल्यावर अनिल शिंदे, सचिन जाधव, बाबूशेट टायरवाले आदींनी शिंदे गटाची वाट धरली.
महापालिकेतील महापौर पद आणि सत्तेमुळे काही नगरसेवक ठाकरे गटात राहिले होते. मात्र, सत्ता संपल्यानंतर आणि राज्यात शिंदे गट मजबूत होत गेल्यावर आठ ते दहा माजी नगरसेवक शहरप्रमुखांसह शिंदे गटात दाखल झाले.
कधीकाळी शिवसेनेत नेतृत्वाच्या पद्धतीवरून विरोध करणारे, पक्षांतर करणारे आणि नाराजीत गप्प बसलेले शिवसैनिक आता पुन्हा एकत्र आले आहेत. काही भाजपमध्ये, काही राष्ट्रवादीत असले तरी महायुतीमुळे ते अप्रत्यक्षपणे एकाच मंचावर आहेत. त्यामुळे जुनी शिवसेना फुटल्यानंतर तयार झालेली साखळी आता शिंदे गटाच्या छत्राखाली पुन्हा जुळल्याचे स्पष्ट झाले आहे.
महापालिका निवडणूक जसजशी जवळ येत आहे, तसतसे हे एकत्र येणारे नेते आणि शिवसैनिक आगामी राजकीय समीकरणांवर परिणाम करू शकतात. आता हे गट नव्या पक्षसंघटनेत एकत्र राहणार की पुन्हा वेगवेगळ्या वाटा शोधणार, हे निवडणुकीत स्पष्ट होईल.