शिक्षक मतदारसंघाची उद्या निवडणूक ! कोणकोणते मतदान केंद्र? किती कर्मचारी ? किती उमेदवार व किती मतदार? जाणून घ्या सविस्तर

विधान परिषदेच्या नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघासाठी बुधवारी (ता. २६) मतदान होत आहे. जिल्ह्यात १७ हजार ३९२ मतदार असून, २० मतदान केंद्र आहेत. मतदान केंद्र अधिकाऱ्यांना मंगळवारी सकाळी जिल्हाधिकारी कार्यालयात साहित्य वाटप केले जाणार आहे.

Published on -

विधान परिषदेच्या नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघासाठी बुधवारी (ता. २६) मतदान होत आहे. जिल्ह्यात १७ हजार ३९२ मतदार असून, २० मतदान केंद्र आहेत. मतदान केंद्र अधिकाऱ्यांना मंगळवारी सकाळी जिल्हाधिकारी कार्यालयात साहित्य वाटप केले जाणार आहे.

या निवडणुकीत २१ उमेदवार निवडणूक रिंगणात असल्याने चुरस वाढली आहे. या निवडणूकीसाठी एकूण २१ उमेदवार रिंगणात असले तरी प्रमुख राजकीय पक्ष, अपक्ष उमेदवार विवेक कोल्हे व टीडीएफ यांच्यातच लढत दिसते.

असा आहे कर्मचारी वर्ग
मतदान केंद्राच्या अनुषंगाने प्रत्येक केंद्रासाठी सहा कर्मचारी नियुक्त केले जाणार आहेत. त्यात एक केंद्राध्यक्ष, तीन कर्मचारी, एक सूक्ष्म निरीक्षक, एक शिपाई असे ६ कर्मचारी प्रत्येक मतदान केंद्रावर असतील. त्यासाठी १७४ कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे.

यासोबतच बंदोबस्तासाठी फ्लाईंग स्कॉड असेल. त्यात २ पोलिस कर्मचारी, व्हिडीओ पाहणी पथक १, भरारी पथक १, व्हिडीओ निरीक्षक १ असे ५ जणांचे पथक राहणार आहे. जिल्हा प्रशासन या नियोजनावर अखेरचा हात फिरविताना व्यस्त दिसून येत आहे. त्यासाठी लागणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांची नेमणूक त्यांच्या वाहनांची व्यवस्था व नियोजन पूर्ण झाले आहे.

कोठे किती मतदार
नाशिक विभागात ६९ हजार ३६८ मतदार आहेत. नाशिक आणि अहमदनगर जिल्ह्यांतील मतदारांची संख्या मोठी आहे. नाशिक जिल्ह्यात २५ हजार ३०२ मतदार असून, त्याखालोखाल नगर जिल्ह्यात १७ हजार ३९२ मतदार आहेत. जळगाव जिल्ह्यात १३ हजार १२२, धुळे जिल्ह्यात ८ हजार १५९, तर नंदुरबार जिल्ह्यात ५ हजार ३९३ मतदार आहेत.

नगर जिल्ह्यातील मतदान केंद्र
अकोले: तहसील कार्यालय
संगमनेरः शारदा शिक्षण मंदीर
राहाता: तहसिल कार्यालय
कोपरगावः तहसिल कार्यालय

श्रीरामपूरः श्रीरामपूर नविन मराठी शाळा
नेवासाः जि.प.प्राथमिक शाळा, नेवासा खुर्द
शेवगावः तहसिल कार्यालय
पाथर्डी: तहसिल कार्यालय
राहुरीः जुने सेतू कार्यालय

पारनेरः तहसिल कार्यालय
नगर शहर: रेसिडेन्शील महाविद्यालय
श्रीगोंदाः जि.प.प्राथमिक शाळा
कर्जतः तहसिल कार्यालय
जामखेडः तहसिल कार्यालय

रिंगणातील उमेदवार
किशोर दराडे (शिंदेसेना), अॅड. संदीप गुळवे (उद्धवसेना), अॅड. महेंद्र भावसार (राष्ट्रवादी काँग्रेस), भागवत गायकवाड (समता पार्टी), अनिल तेजा, अमृतराव शिंदे, इरफान नादिर, भाऊसाहेब कचरे, विवेक कोल्हे, सागरदादा कोल्हे, संदीप कोल्हे, गजानन गव्हारे, संदीप गुरुळे, सचिन झगडे, दिलीप डोंगरे, आर. डी. निकम, डॉ. छगन पानसरे, रणजीत बोठे, महेश शिरुडे, रतन चावला, संतोष गुळवे (अपक्ष).

मतपत्रिका आज मतदान केंद्रांवर
या निवडणुकीसाठी मतपत्रिकेवर मतदान होते. मतदारांना पसंती क्रमांकाद्वारे मतदान करावे लागते. मतपत्रिका आणि मतदानासाठीचे साहित्य वाटपासाठी जिल्हाधिकारी कार्यालयातील पंडित नेहरू सभागृहात उद्या सकाळी १० वाजता मतदान केंद्र अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची बैठक आयोजित केली आहे.

सहायक निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी मार्गदर्शन करणार आहेत. त्यानंतर जिल्हा निवडणूक विभागाकडून मतपत्रिका आणि मतदानासाठी लागणारे साहित्याचे वाटप होणार आहे. तहसीलदार हे मतदान केंद्र प्रमुख तर वर्ग दोनचे अधिकारी हे मतदान प्रक्रियेतील अन्य जबाबदाऱ्या पार पाडणार आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe