भाड्याचे भोंगे आणि लाऊडस्पीकर यात फरकच; राऊतांचा फडणवीसांवर पलटवार

मुंबई : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लाऊडस्पीकर असा उल्लेख करत केलेल्या अप्रत्यक्ष टीकेला शिवसेना प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत यांनी सडेतोड उत्तर दिले आहे. ‘आमचा लाऊडस्पीकर हा महाराष्ट्राच्या जनतेचा बुलंद आवाज आहे आणि तो तसाच घुमत राहील’, असे संजय राऊत मुंबईत बोलत होते.

आम्ही भाजपप्रमाणे सरकार कोसळेल असे लाऊडस्पीकरवरुन सांगणार नाही. त्यांच्या पिपाण्या वाजत होत्या. पण हे सरकार टिकणार नाही, बहुमत गमावेल, अंतर्गत कलाहाने पडेल. कोणाला काय बोलायचे आहे, पिपाण्या वाजवायच्या आहेत, सनई चौघडे वाजवायचे आहेत ते वाजवू द्या. आमचा लाऊडस्पीकर हा महाराष्ट्राच्या जनतेचा बुलंद आवाज आहे आणि तो तसाच घुमत राहील, असे प्रतिपादन संजय राऊत यांनी केलं आहे.

आदित्य ठाकरेंचा दौरा ठाण्यातून सुरु झाला आहे. आदित्य ठाकरेंच्या दौऱ्याला, सभांना, रोड शोला जो प्रतिसाद मिळत आहे, त्यासाठी उदंड हा शब्द कमी पडेल. ज्यांनी महाराष्ट्रात चोऱ्यामाऱ्या करुन सरकार स्थापन केले त्यांच्यासाठी हे छातीत धडकी भरवणारे आहे. अनेक निष्ठावान शिवसैनिकांच्या डोळ्यात अश्रू आले. अश्रूंच्या महापुरात हे सरकार वाहून गेल्याशिवाय राहणार नाही, ही भावना महाराष्ट्रात सर्वत्र दिसत आहे, असे संजय राऊत म्हणाले आहेत.

शिवसेनेचा लाऊडस्पीकर ५६ वर्ष सुरु आहे. यावरील संदेश आणि गर्जना ऐकण्यासाठी महाराष्ट्र आणि देश एका निष्ठेने शिवेसनेच्या मागे उभा आहे. आधी सरकार स्थापन करा. एक महिन्यानंतरही तुम्ही ‘एक दुजे के लिये’ स्क्रिप्टमध्ये अडकून पडला आहात. किती वेळा दिल्ली जाणार आहात?, अशी विचारणा संजय राऊतांनी केली आहे.

Devendra Fadnavis, Sanjay Raut, Loud Speaker, Shiv Sena, BJP, Uddhav Thackeray, देवेंद्र फडणवीस, संजय राऊत, लाऊड स्पीकर, शिवसेना, भाजप, उद्धव ठाकरे,

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe