MP Nilesh Lanke : छत्रपती शिवरायांचे विचार सरकार विसरले ! वक्फ बोर्डाच्या विधेयकावरून खा. लंके यांचा हल्लाबोल

वक्फ बोर्डाच्या मालमत्तांवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप

Published on -

MP Nilesh Lanke News : केंद्र सरकारमधील सत्ताधाऱ्यांनी सत्तेत येताना छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेतले. सत्ता मिळाल्यानंतर मात्र आपण शिवरायांच्या विचारांना सोडले हे दुर्देव असल्याचे सांगत वक्फ बोर्ड विधेयकावरून खासदार नीलेश लंके यांनी बुधवारी संसदेत सरकारवर हल्लाबोल केला. बुधवारी वक्फ बोर्ड विधेयकावरील चर्चेत सहभागी होताना खा. नीलेश लंके यांनी विविध दाखले देत या विधेयकात काही गंभीर आणि चिंताजनक मुददे असल्याचे ठामपणे सांगितले.

यावेळी बोलताना खा. लंके यांनी सांगितले की, विधेयकामध्ये वक्फ बोर्ड सशक्त करायचे आहे असे सांगितले आहे. परंतू प्रत्यक्षात त्यांचे अधिकार सरकारकडे हस्तांतरीत होत आहेत. वक्फ बोर्डाकडे सुमारे ९.४ लाख एकर जमीन आहे. त्याची अंदाजे किंमत १.२ लाख कोटी रूपये इतकी आहे. प्रश्न इतका आहे की हे वक्फ बोर्डाचे सशक्तीकरण आहे की त्यावर ताबा मिळविण्याचा डाव आहे असा सवाल खा. लंके यांनी केला.

खा. लंके म्हणाले, वक्फ बोर्डाचे अधिकार कमी न करता योग्य बदल करून त्यात सुसुत्रता आणण्याचा प्रयत्न करावा. सशक्तीकरणाच्या नावाखाली संस्थेचे स्वातंत्रय हिरावू नये. अल्पसंख्यांक समाजाच्या भावना लक्षात घेता त्या समाजाचे प्रतिनिधीत्व त्या बोर्डामध्ये पुरेशा संख्येने असावे अशी मागणी खा. लंके यांनी केली.

लंके पुढे म्हणाले, वक्फ बोर्डासंदर्भातील विधेयकामागील हेतू सशक्तीकरणाचा असल्याचे सरकार सांगत आहे. मात्र या विधेयकात काही गंभीर आणि चिंताजनक मुद्दे आढळत आहेत. हे विधेयक पाहिल्यानंतर असे वाटते की वक्फ बोर्डाच्या मालमत्तांवर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न सुरू आहे की काय ? सशक्तीकरणाच्या नावाखाली संस्थेला कमजोर करण्याचा धोका दिसत असल्याचे खा. लंके यांनी नमुद केले.

या विधेयकावर निर्णय घेताना फायदे किंवा मालमत्ता न पाहता जनतेच्या भावना, संविधानाचे मुल्य आणि छत्रपती शिवरायांचे सर्वसमावेशक विचार लक्षात ठेवावेत अशी विनंती खा. लंके यांनी यावेळी बोलताना केली.

शिवराय हे केवळ तलवार चालविणारे योध्दे नव्हते तर ते सर्व धर्मांना समान वागणूक देणारे, लोकशाही मुल्य जपणारे राजे होते. त्यांनी समाज, धर्म, पंथ, जात, भाषा असे न पाहता त्यांनी सर्वांना सोबत घेतले. त्यांनी माणूस पाहिला आणि माणूसकी जागविल्याचे खा. लंके म्हणाले.

शिवरायांचा विचार सर्व धर्मांना सोबत घेउन जाणारा होता. त्यांनी सर्व धर्मांना मान दिला, प्रत्येकाला सन्मान दिला. हे सांगताना खा. लंके यांनी कवितेच्या काही ओळी उध्दृत केल्या. जाती-पातीचा नको भेद, साऱ्यांना दिला एकच वेध, न्याय करू या धैर्य अपार असा होता शिवरायांचा विचार.

मुस्लिम, पारशी, शिख, जैन, नवबौध्द हे अल्पसंख्यांक समाज हे केवळ सांस्कृतीक नव्हे तर राष्ट्रीय उभारणीचे भागीदार आहेत. पारशी समाजाचे सायरस पुनावाला ज्यांनी ज्यावेळी कोव्हिडची महामारी आली त्यावेळी लस तयार करून हजारो लोकांचा जीव वाचविण्याचा प्रयत्न केला. पारशी समाजाचे रतन टाटा यांनी सीएसआरच्या माध्यमातून सर्वाधिक सामाजिक उपक्रम राबविण्याचे काम केले.

डॉ. अब्दुल कलाम हे एक शास्त्रज्ञ आणि देशाचे राष्ट्रपती म्हणून आदर्श काम करणारे मुस्लिम समाजाचे होते. विप्रो कंपनीचे अजिज प्रेमजी यांनी सामाजिक कामासाठी सर्वाधिक सीएसआरचा निधी खर्च केला. ख्रिश्चन समाजाच्या मदर तेरेसा यांनी जीवनाच्या शेवटच्या क्षणापर्यंत कुष्ठरोग्यांची सेवा करण्याचे काम केले. शिख समाजाचे शहीद भगतसिंग यांनी देशासाठी हसत हसत बलीदान दिले. आचार्य आनंदॠषीजी महाराज यांच्या नावाने जैन समाजाने आनंदॠषीजी हॉस्पिटलच्या माध्यमातून अनेकांना जीवनदान देण्याचे काम केले आहे.

सभापती, खा. सुळेंकडून कौतुक !
पीठासिन अधिकारी दिलीप सैकिया यांनी खा. लंके यांनी आपली भुमिका मांडल्यानंतर माननिय सदस्य आपण छत्रपती शिवाजी महाराजांविषयी अतिशय चांगल्या पध्दतीने स्पष्टीकरण दिल्याचे सांगत खा. लंके यांचे कौतुक केले. आम्हा सर्वांना माहिती आहे की छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केलेली आहे. दरम्यान, खा. लंके यांनी आपली भूमिका ठामपणे मांडल्यानंतर खा. सुप्रिया सुळे यांनीही खा. लंके यांची पाठ थोपटून कौतुक केले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe