कोपरगाव- राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे बिगूल वाजले असून, येत्या चार महिन्यांत कोपरगाव नगरपालिकेची निवडणूक होईल, असे चित्र स्पष्ट होऊ लागले आहे. त्यामुळे राज्यातील इतर शहरांत राजकीय हालचालींना चांगलाच वेग आला असून, विविध आघाड्या, गट-तट, इच्छुक उमेदवारांच्या बैठकांची लगबग सुरू झाली आहे; मात्र कोपरगाव अजूनही सुस्तावलेले दिसत आहे.
कोपरगाव हे ऐतिहासिक आणि सुसंस्कृत राजकारणाची परंपरा लाभलेले शहर. नगरपालिकेच्या राजकारणात सातत्याने काळे-कोल्हे यांच्या गटाचे वर्चस्व राहिले आहे. आजही अनेक आघाड्या त्याच पायवाटेने कार्यरत आहेत. शहरातील काळे, कोल्हे, कोयटे, कुदळे, सातभाई, आढाव या प्रमुख आघाड्यांचा साधारणपणे समावेश असून, काही काळ शिवसेनेने देखील यात बऱ्यापैकी यशस्वी घुसखोरी करून आपलाही ठसा उमटवलेला दिसला.

विधानसभेचे दावेदार प्रतिस्पर्धी काळे-कोल्हे या दोन्हींचा प्रभाव कोपरगाव शहरात आहे. कोपरगाव विधानसभा बऱ्यापैकी काळे व कोल्हे यांच्यामध्ये विभागलेले असून, दोन्ही आजी-माजी आमदारांचा कोपरगाव नगरपालिकेच्या राजकारणावर नेहमीच प्रभाव राहिलेला आहे. यापूर्वी सातत्याने माजी मंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांच्या गटांचे वर्चस्व राहिलेले आहे.
२०१९ च्या निवडणुकीत माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांच्या पराभवानंतर सत्तांतर झाले असले तरीही कोल्हे नगरसेवक गटाचे बहुसंख्येने होते, मात्र, नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत पक्षीय समीकरणामुळे आ. आशुतोष काळे यांनाच निवडून द्यावे लागले असून, या दोन्ही लोकप्रतिनिधींचे लक्ष यावेळी नगरपालिकेवर राहणार आहे.
यापूर्वी काही काळ यांच्या राहिलेल्या आशीर्वादाने कोयटे, कुदळे, सातभाई, आढाव या परंपरागत आघाड्या इतिहास जमा झाल्या आहेत. थेट काळे आणि कोल्हे यांच्याकडे नेतृत्व आहे. हे दोघे मिळून उमेदवार निश्चित करतील. नगरपालिकेचे बलाबल वर्चस्व सातत्याने कोल्हे यांच्याकडे असून, मागील निवडणुकीत जनतेतून नगराध्यक्ष असल्याने बलाबल असूनही नगराध्यक्षपद अपक्ष उमेदवाराला मिळाले होते. काळे-कोल्हे या बलाढ्य शक्तीच्या तुलनेत तिसरी शक्ती म्हणून शिवसेना आघाडी ही तुलनेत कमी बळाची असली तरीही, काही ठिकाणी ही आघाडी महत्त्वाची भूमिका बजावू शकते.
विवेक कोल्हे हे चाणाक्ष आणि अनुभवी युवा नेते म्हणून परिचित आहेत. दुसरीकडे आ. आशुतोष काळे हे सुद्धा धोरणी व दूरदृष्टी असलेले राजकारणी आहेत. त्यामुळे एकीकडे काळे-कोल्हे यांच्यातील नगरपालिका सत्तासंघर्ष अधिक तीव्र होत असताना, दुसरीकडे शिवसेना स्वतंत्रपणे रिंगणात उतरण्याचा विचार करत आहे. निवडणुकीस चार महिने शिल्लक असतानाही कोपरगाव शहरातील राजकीय बैठका, चर्चासत्रे, प्रचार यंत्रणा, संपर्क दौरे, सोशल मीडियाचा वापर, यांसारख्या हालचालींना म्हणावा तसा जोर आलेला नाही.