संगमनेर – सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात आणि पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखान्यांच्या संचालक मंडळाच्या निवडणुका जाहीर झाल्या असून, उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया ३ एप्रिलपासून सुरू होणार आहे. थोरात कारखान्यासाठी ११ मे तर विखे कारखान्यासाठी ९ मे रोजी मतदान होणार आहे.
जिल्ह्यातील दोन दिग्गज नेते पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि माजी आमदार बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखालील साखर कारखान्यांच्या निवडणुका एकाचवेळी जाहीर झाल्याने राजकीय वातावरण चांगलेच तापणार आहे.

दोन्ही नेत्यांमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून राजकीय वर्चस्वासाठी संघर्ष सुरू आहे. विधानसभा निवडणुकीत त्याचा ठळक प्रभाव दिसून आला होता. आता साखर कारखान्यांच्या निवडणुकीतही त्याचा जोरदार प्रत्यय येण्याची शक्यता आहे.
सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात साखर कारखान्याच्या संचालक मंडळासाठी २१ जागांसाठी निवडणूक होणार आहे. अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत ९ एप्रिल आहे. ११ मे रोजी मतदान आणि १२ मे पासून मतमोजणी होणार आहे.
पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीसाठीही अर्ज भरण्याची अंतिम तारीख ९ एप्रिल असून ९ मे रोजी मतदान होईल.
थोरात कारखान्याचा निवडणूक कार्यक्रम कसा असणार आहे.
अर्ज दाखल – ३ ते ९ एप्रिल, सकाळी ११ ते दुपारी ३
प्राप्त अर्ज प्रसिद्ध – ३ ते ९ एप्रिल, दुपारी ४
अर्ज छाननी – ११ एप्रिल
विधिग्राह्य अर्जांची यादी प्रसिद्ध – १५ एप्रिल
अर्ज माघार – १५ ते २९ एप्रिल
चिन्ह वाटप – २ मे
मतदान – ११ मे (सकाळी ८ ते सायंकाळी ५)
मतमोजणी – १२ मे (सकाळी ९ नंतर)
राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाचे सचिव अशोक गाडे यांनी तहसीलदार धीरज मांजरे यांची सहायक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून नियुक्ती केली आहे.
या निवडणुकांमुळे थोरात आणि विखे गटांमध्ये पुन्हा एकदा जोरदार लढत पाहायला मिळणार आहे. नेत्यांसाठी या निवडणुका म्हणजे राजकीय वर्चस्व सिद्ध करण्याची संधी असल्याने प्रचार रणधुमाळी रंगण्याची शक्यता आहे. त्यामुळे राजकीय हालचाली वेग घेणार आहेत, आणि जिल्ह्याचे राजकारण या निवडणुकांभोवती फिरताना दिसेल.