शनिवारी (दि. २६) रात्री दहा वाजता महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे श्रीक्षेत्र शनिशिंगणापूर येथे सहकुटुंब दर्शनासाठी आले होते. कन्या पायल बावनकुळे यांचा वाढदिवस असल्याने शनिशिंगणापूरला शनी देवाचा आशीर्वाद घेण्यासाठी सहकुटुंब आलो असल्याचे बावनकुळे म्हणाले.
33 वर्षापासून शिर्डी आणि शनिशिंगणापूर येथे दर्शनासाठी येत असल्याचे ते म्हणाले. तसेच देवस्थानच्या कारभाराविषयी आलेल्या तक्रारींबाबत सर्व बाबी पूर्ण झाल्याने देवस्थानचे प्रशासन लवकरच बरखास्त होणार आहे. शनिशिंगणापूर देवस्थान बाबत मंत्रालयात पुढील बैठक लवकरच घेतली जाणार असल्याचे सुतोवाच महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी यावेळी केले.

नेवासा तालुका भारतीय जनता पार्टीच्या वतीने त्यांचा सन्मान यावेळी करण्यात आला. यावेळी नेवासा तालुक्याचे आमदार विठ्ठल लंघे पाटील, किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष अंकुशराव काळे, भाजपा तालुका अध्यक्ष प्रतापराव चिंधे, मराठा महासंघाचे नेते संभाजीराजे दहातोंडे, तालुकाध्यक्ष संभाजीराव जगताप, लोकनियुक्त सरपंच गजभार, ऋषिकेश शेटे, सरपंच पांडुरंग वाघ, बंडू कोतकर, भाजपा-शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते.
देवस्थानचे प्रशासन बरखास्त होणार, कारवाईही होणार? देवस्थानच्या कारभाराविषयी आलेल्या तक्रारींबाबत सर्व बाबी पूर्ण झाल्याने देवस्थानचे प्रशासन लवकरच बरखास्त होणार आहे. शनिशिंगणापूर देवस्थान बाबत मंत्रालयात पुढील बैठक लवकरच घेतली जाणार असल्याचे सुतोवाच महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी यावेळी केले. तक्रारींमध्ये तथ्य आढळले असेल म्हणूनच प्रशासन बरखास्त केले जाणार असेल तर मग दोषींवर कारवाई देखील केली जाणार आहे का? असा प्रश्न सध्या नागरिकांना पडला आहे.













