पक्षातील फाटाफूट कोण्याच्या पथ्यावर पडणार ? विधानसभेला कोण बाजी मारणार; थोरात की विखे… !

Published on -

Ahmednagar Politics : राजकारणात अहमदनगर जिल्ह्यात जो पॅटर्न राबवला जातो अनेकदा तोच पॅटर्न राज्यात राबवला जातो. तसेच सहकाराचा बालेकिल्ला म्हणून देखील अहमदनगर जिल्ह्याची ओळख आहे. मात्र येथील राजकारण हे नेहमीच सोयरेधायऱ्यांचे राजकारण अशी देखील नगरची राजकीय ओळख पुढे येत आहे.

मात्र राज्यातील राजकारणात अनेक मोठे बदल झाले असून पक्षात देखील मोठ्या प्रमाणात फूट पडली आहे. याचा प्रत्यय नुकत्याच झालेल्या लोकसभेत आला आहे. आता या पार्श्वभूमीवर आगामी विधानसभा निवडणूक महत्त्वाची ठरणार आहे.

कारण एकीकडे शरद पवार, बाळासाहेब थोरात हे दोन मोठे नेते जिल्ह्यात आपली ताकद लावतील, त्यांच्या सोबतीला खासदार निलेश लंके हे देखील असतील त्यामुळे आता महसूल मंत्री राधाकृष्ण विखे यांना पुन्हा एकदा मोठा संघर्ष करावा लागणार आहे.

काना, मात्र, वेलांटी, अन उकार नसलेला राज्यातील एकमेव जिल्हा म्हणजे अहमदनगर. सहकारी तत्त्वावर सुरू झालेला आशिया खंडातील पहिला सहकारी साखर कारखाना नगर जिल्ह्यात आहे. त्यामुळे सहकाराचा बालेकिल्ला म्हणून अहमदनगर जिल्हा ओळखला जातो.

जिल्ह्यात एकूण बारा विधानसभा मतदारसंघ आहेत मात्र आजवर थोरात आणि विखे यांच्या भोवतीच जिल्ह्याचे राजकारण फिरत असल्याचे दिसून आले. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत अहमदनगरच्या जनतेने सुजय विखेंना डावलून निलेश लंके यांना पसंती दर्शवली. त्यामुळे आगामी काळात विखे यांना मोठा संघर्ष करावा लागणार असल्याचे अधोरेखित झाले आहे.

आता राज्यात विधानसभा निवडणुकीची वेध लागले आहेत. महाविकास आघाडी आणि महायुतीकडून विधानसभेची जोरदार तयारी करण्यात येत आहे. जागावाटपासाठी बैठकावर बैठका होतील. दोन ते तीन महिन्यामध्ये राज्यातील विधानसभा निवडणुका जाहीर होतील.

२०१९ मध्ये ऑक्टोबर महिन्यामध्ये विधानसभेचा बिगुल वाजला होता. येत्या सप्टेबर किंवा ऑक्टोबर मध्ये महाराष्ट्र विधानसभेसाठी निवडणूक होऊ शकते. यामध्ये अहमदनगर जिल्ह्याकडे सर्वांच्याच नजरा असतील. एकंदरीत महाविकास आघाडी आणि महायुती यांच्यात जोरदार लढत होण्याची शक्यता आहे.

अहमदनगर जिल्ह्यात एकूण बारा विधानसभा मतदारसंघ असून .२०१९ च्या विधानसभा भाजप शिवसेना युती विरुद्ध काँग्रेस राष्ट्रवादी आघाडी अशी लढली गेली. मात्र गेल्या दोन वर्षात राज्यात शिवसेनेत दोन तर राष्ट्रवादीत देखील दोन गट पडले. आज अहमदनगर जिल्ह्यात सात जागा महायुतीच्या ताब्यात तर उर्वरित पाच जागा महाविकास आघाडीच्या पारड्यात आहेत.

राष्ट्रवादीत दोन गट पडल्याने अहमदनगर जिल्ह्यातील आशुतोष काळे, डॉक्टर किरण लहामटे आणि संग्राम जगताप हे तीन आमदार अजित पवारांसोबत गेले तर रोहित पवार आणि प्राजक्त तनपुरे हे दोन आमदार शरद पवारांसोबत आहेत.

शिवसेनेचा एकही आमदार पक्षाच्या चिन्हावर निवडून आला नाही. मात्र निवडणुकीनंतर शंकरराव गडाख यांनी उद्धव ठाकरे यांना पाठिंबा दिला आहे. लोकसभेत जिल्ह्यातील दोन्ही जागा महाविकास आघाडीने जिंकल्या आहेत. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत पुन्हा एकदा अहमदनगर जिल्ह्यात मोठी चुरस दिसून येईल.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe