राज्य शासनाने घेतला महत्त्वपूर्ण निर्णय ; सर्वसामान्य जनतेसाठी ‘या’ महसूल गावात ‘या’ शिबिराचे आयोजन..

२७ जानेवारी २०२५ : संगमनेर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली प्रत्येक विभागासाठी १०० दिवसाचा कृती आराखडा दिलेला आहे. या कृती आराखड्याच्या माध्यमातून सर्वसामान्यांचे प्रलंबित प्रश्न सोडविले जाणार आहे,अशी माहिती आमदार अमोल खताळ यांनी दिली.

तालुक्यातील घुलेवाडी येथील ग्राम महसूल अधिकारी कार्यालय आणि तहसील कार्यालय यांच्या संयुक्त सहकार्याने क्षेत्रीय कार्यालयांसाठी १०० दिवसाचा कृती आराखडा कार्यक्रमांतर्गत पावबाकीच्या मारुती मंदिराच्या प्रांगणात शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी ते बोलत होते.

याप्रसंगी तहसीलदार धीरज मांजरे, संगमनेर नगरपालिकेचे माजी उपनगराध्यक्ष जावेद जागीरदार, भाजपा ओबीसी मोर्चाचे जिल्हाध्यक्ष भारत गवळी, राहुल भोईर, राजेंद्र सांगळे, दिलीप रावळ आदी उपस्थित होते.यावेळी आ. खताळ पुढे म्हणाले, राज्यातील महायुती सरकार जनतेच्या हिताचे अनेक निर्णय घेत आहे.

जमिनीची तुकडा नियमाकुल करण्यासाठी पूर्वीच्या काळी २५ टक्के शुल्क आकारले जात होते.ही रक्कम जास्त असल्यामुळे अनेक जण ती भरत नव्हते.मात्र राज्य शासनाने तुकडे नियमकुल करण्यासाठीची शुल्क पाच टक्के करण्याचा निर्णय घेतला.घुलेवाडी, सुकेवाडी, गुंजाळवाडी, कासारवाडी, या भागाचा विस्तार मोठ्या प्रमाणात वाढत आहे.त्यामुळे या भागातील नागरिकांच्या अडीअडचणी महसूल शिबिराच्या माध्यमातून सोडविल्या जाणार आहे.

त्यामुळे या शिबिराचा परिसरातील नागरिकांनी लाभ घ्यावा,असे आवाहन आ. खताळ यांनी केले.जमिनीचे तुकडे नियमाकुल करण्याचे धोरण राज्य शासनाने आणले आहे.त्यासाठी शासनाने शंभर दिवसाचा कृती आराखडा तयार करण्याबाबत निर्देश दिले आहे.

तुकडे नियमाकुल करण्याचे धोरण सर्वसामान्य जनतेला समजावे.यासाठी दोन दिवस घुलेवाडी व गुंजाळवाडी या महसूल गावात या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.त्याचा या दोन्ही गावातील नागरिकांनी लाभ घ्यावा,असे आवाहन तहसीलदार धीरज मांजरे यांनी यावेळी केले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe