Ahmednagar News : राज्य साखर संघाचे दिवंगत अध्यक्ष शिवाजीराव नागवडे यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून, यासाठी राष्ट्रवादीचे नेते उपमुख्यमंत्री अजित पवार यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.
नागवडेंच्या जयंती सोहळ्यानिमित्त उपस्थित राहणाऱ्या अजित पवारांमुळे तालुक्यात नव्या राजकीय बदलांची समीकरणे ठरणार का? या बाबत मोठी चर्चा होत असतानाच होणाऱ्या कार्यक्रमाबाबत तालुक्यात उत्सुकता होत आहे.
राज्य बाजार समिती महासंघाचे सभापती बाळासाहेब नाहाटा तसेच काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र नागवडे यांनी मागील आठवड्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मुंबई येथे भेट घेत १९ जानेवारी रोजी शिवाजीराव नागवडे यांच्या जयंतीनिमित्त होणाऱ्या कार्यक्रमाचे निमंत्रण अजित पवार यांना दिले.=
अजित पवार यांनी कार्यक्रमाचे निमंत्रण स्वीकारले असून, त्यांच्या प्रमुख उपस्थितीत जयंतीसोहळा होणार आहे. त्याच बरोबर या भेटीत तालुक्यातील तालुक्यातील राजकीय परिस्थितीबद्दल चर्चा झाल्याची माहिती समोर येत आहे.
सोमवारी(दि.१) सायंकाळी राजेंद्र नागवडे यांनी कारखान्याच्या अतिथीगृहावर प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक घेत याबाबत माहिती दिली. या बैठकीला नागवडे कारखान्याचे उपाध्यक्ष बाबासाहेब भोस, सुरेश लोखंडे, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष धर्मनाथ काकडे,
आदेश नागवडे, योगेश भोईटे, महेश जंगले आदी उपस्थित होते. दरम्यान राजेंद्र नागवडे व अनुराधा नागवडे यांच्याकडे अनुक्रमे काँग्रेस व महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी आहे. अजित पवार महायुती सरकारमध्ये उपमुख्यमंत्री आहेत.
त्यामुळे नागवडेंच्या जयंतीनिमित्त उपस्थित राहणाऱ्या उपमुख्यमंत्री अजित पवारांमुळे तालुक्यातील राजकीय समीकरणं बदलणार का? या बाबत उत्सुकता तालुक्यात होत आहे.