तिथे फलप्राप्ती झाल्याशिवाय ते गप्प बसतील असे वाटत नाही; मंत्रिमंडळाबाबत जयंत पाटलांचं भाकित

Published on -

मुंबई : गुवाहाटीतील वस्तीचे दिवस आणि आतापर्यंतचे दिवस पाहिले तर दोन महिने झाले मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दिल्लीतील वाटाघाटीत व्यस्त आहेत. दुसरीकडे राज्याला अपंग करुन सोडलंय, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी केली आहे. जयंत पाटील यांनी प्रदेश कार्यालयात प्रसारमाध्यमांशी बोलताना शिंदे सरकारवर हल्लाबोल केला आहे.

ज्याअर्थी मंत्रिमंडळाचा विस्तार करत नाही, त्याअर्थी त्यांच्यात मतभेद आहेत. जीवाभावाची शिवसेना सोडून गेले असल्याने तिथे फलप्राप्ती झाल्याशिवाय ते गप्प बसतील असे वाटत नाही, त्यामुळे मतभेदाची जास्त शक्यता आहे, असे जयंत पाटील म्हणाले आहेत.

राज्यातील गोरगरीबांचे प्रश्न सुटण्याऐवजी वाढायला लागले आहेत. राज्यात पूरपरिस्थिती मोठी आहे. पुरामुळे सामान्य नागरिक हैराण झाला आहे. त्या भागात पालकमंत्री नाहीत, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या रुपाने फक्त दोन मंत्री आहेत. परंतु गुंता सोडवण्यातच त्यांचा जास्त काळ जात आहे, अशी टीकाही जयंत पाटील यांनी केली आहे.

राज्यात पूरपरिस्थिती असल्याने जनता हवालदिल झाली आहे. हे लोक पावसाळा संपेपर्यंत थांबले असते तर आमचे आघाडीतील मंत्री तिथे ठाण मांडून बसले असते आणि फार मोठी मदत लोकांना झाली असती. महाराष्ट्रात मंत्री नसल्याने जिल्हया-जिल्हयात दयनीय अवस्था झाली आहे आणि हीच अवस्था लोकांना चिंता करायला लावणारी आहे, असंही जयंत पाटील म्हणाले आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe