अहिल्यानगर- अहिल्यानगर येथे भारतीय जनता पक्षाचा ४५ वा स्थापना दिन रविवारी शहरातील लक्ष्मी कारंजा येथील पक्ष कार्यालयात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांनी उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्त्यांना उद्देशून पक्षनिष्ठेचा आणि विचारधारेशी बांधिलकीचा संदेश दिला.
राम शिंदेचा इशारा
प्रा. शिंदे यांनी स्पष्टपणे सांगितले की सत्ता येते-जाते, पदं मिळतात व जातात, पण विचार आणि निष्ठा या कायमस्वरूपी असाव्यात. पक्षाच्या मूल विचारधारेविरोधात कोणी वागत असेल, तर अशा प्रवृत्तींविरोधात संघर्ष करण्यासही मागे हटू नका, असा इशारा त्यांनी दिला.

भाजपची विचारधारा
पूर्वी भाजपाच्या कार्यकर्त्यांकडे अन्य पक्षांचे नेते उपहासाने पाहायचे, असे सांगताना शिंदे म्हणाले की, आज त्याच नेत्यांना भाजपाचीच साथ हवीशी वाटते. ही परिस्थिती हेच दर्शवते की भाजपाची विचारधारा आता सर्वसामान्यांपर्यंत पोहोचली आहे आणि स्वीकारली जात आहे.
जुन्या कार्यकर्त्यांचं कौतुक
शिंदे यांनी पक्ष स्थापनेपासून काम करणाऱ्या जुन्या कार्यकर्त्यांच्या योगदानाचे कौतुक केले. त्यांनी सांगितले की, अशा कार्यकर्त्यांचा मान राखणे, त्यांच्या अनुभवाचा आदर करणे हे पक्षाच्या संस्कृतीचे लक्षण आहे.
आठवणींना उजाळा
स्थापना दिन कार्यक्रमात प्रा. शिंदे यांच्या हस्ते प्रतिमापूजन व दीपप्रज्वलन करण्यात आले. प्रास्ताविक प्रा. भानुदास बेरड यांनी केले. या वेळी अॅड. अभय आगरकर, अच्युत पिंगळे, मधुसूदन मुळे, दामोदर बठेजा, वसंत लोढा आदींनी आपल्या जुन्या आठवणी सांगत पक्षाच्या संघर्षमय वाटचालीचा आढावा घेतला.
या कार्यक्रमात शहर जिल्हाध्यक्ष अॅड. अभय आगरकर, सरचिटणीस सचिन पारखी, माजी जिल्हाध्यक्ष प्रा. भानुदास बेरड, वसंत लोढा, महेंद्र गंधे, अच्युतराव पिंगळे, मधुसूदन मुळे, सुनील रामदासी, प्रशांत मुथा आदी मान्यवर उपस्थित होते. सूत्रसंचालन महेश नामदे यांनी केले, तर आभार प्रदर्शन प्रशांत मुथा यांनी केले.
स्थापना दिनाचे औचित्य साधून पक्ष कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण करणारा हा कार्यक्रम भाजपच्या संघटनात्मक ताकदीचा पुन्हा एकदा प्रत्यय देणारा ठरला.