कोपरगाव मतदारसंघातील साडेतीन लाख सूज्ञ मतदार आमची गॅरंटी घेतील – विवेक कोल्हे

Ahmednagarlive24 office
Published:
Ahmednagar News

Ahmednagar News : पालकमंत्र्यांनी कोपरगावच्या लोकप्रतिनिधींना पाठबळ देत त्यांना पुन्हा आमदार करण्याची गॅरंटी घेतली आहे. ज्यांची गॅरंटी घेतात त्यांचे काय होते, हे २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत संपूर्ण नगर जिल्ह्याने पाहिले आहे.

गेल्या एक-दीड वर्षांपासून ते मंत्री आहेत. आतापर्यंत त्यांचे कोपरगावकडे लक्ष नव्हते. मग आताच त्यांना कोपरगावची आठवण का झाली, असा सवाल सहकारमहर्षी कोल्हे कारखान्याचे अध्यक्ष विवेक कोल्हे यांनी केला आहे.

पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे नाव न घेता काल बुधवारी येथे आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी टीका केली. कोपरगाव मतदारसंघातील साडेतीन लाख सूज्ञ मतदार आमची गॅरंटी घेतील, असेही ते म्हणाले.

महसूलमंत्री विखे पाटील यांनी मंगळवारी (दि.५) कोपरगाव दौऱ्यात विवेक कोल्हे यांचे नाव न घेता, अप्रत्यक्षपणे टीका केली होती. त्यावर विवेक कोल्हे यांनी काल बुधवारी पत्रकार परिषद घेऊन प्रत्युत्तर दिले.

कोल्हे म्हणाले, ते राज्याचे ज्येष्ठ नेते आहेत. जिरवाजिरवीची भाषा करणे त्यांना शोभत नाही. आम्ही कोल्हे कुटुंबीय गेल्या दहा वर्षांपासून भाजपशी एकनिष्ठ राहून पक्ष वाढविण्याचे व जनतेचे प्रश्न सोडवून त्यांना न्याय मिळवून देण्याचे काम करत आहोत.

कोपरगावच्या लोकप्रतिनिधींनी त्यांच्यापुढे शरणागती का पत्करली, असा प्रश्न सर्वसामान्य जनतेला पडला आहे. आम्ही छत्रपती शिवरायांचे मावळे असून स्वाभिमानी आहोत. स्व. शंकरराव कोल्हे हे लढाऊ नेते होते. त्यांचा मी नातू आहे. आम्ही कुणासमोर अजिबात झुकणार नाही.

आम्ही गुडघ्यावर बसून नव्हे तर निडरपणे उभे राहून वार झेलणारे आहोत. तालुक्यात एमआयडीसी व्हावी म्हणून आपण संजीवनी युवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून शासन दरबारी गेल्या पाच वर्षांपासून केलेल्या पाठपुराव्याला अखेर यश आले.

कोपरगाव तालुक्यातील जनता स्वाभिमानी आहे. हा तालुका बाहेरच्या नेत्यांच्या तालावर नाचणारा नाही. बाहेरच्या नेत्यांनी आमच्या भागात येऊन लुडबूड करणे योग्य नाही. जनतेलाही ते मान्य नाही.

ज्यांनी ‘सुदर्शन चक्र’ फिरवून स्व. शंकरराव काळे यांना लोकसभा निवडणुकीत पराभूत केले, त्यांचाच वारसा चालविणाऱ्यांचे मांडलिकत्व आज यांनी पत्करले आहे. पालकमंत्र्यांनी त्यांना पाठबळ देणार असल्याचे सांगून त्यांची गॅरंटी घेतली आहे;

पण त्यांचा जुना इतिहास पाहता कोपरगावच्या लोकप्रतिनिधींनी काय करायचे ते ठरवावे. त्यांना बाहेरच्या नेत्यांना कोपरगाव तालुका कशासाठी आंदण द्यावयाचा आहे? असा प्रश्न कोल्हे यांनी विचारला आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe