२० फेब्रुवारी २०२५ वॉशिंग्टन / फ्लोरिडा : निवडणुकांमध्ये मतदारांचा सहभाग वाढवण्यासाठी अमेरिकेकडून भारताला दिला जाणारा २.१ कोटी डॉलर्सचा (सुमारे १८२ कोटी रुपये) निधी रोखण्याच्या निर्णयाचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी समर्थन केले.मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आदर करतो. परंतु आपण भारताला २.१ कोटी डॉलर्स का देत होतो.त्यांच्याकडे प्रचंड पैसा आहे,असा मुद्दा ट्रम्प यांनी मांडला.
अब्जाधीश उद्योगपती एलन मस्क हे ट्रम्प यांचे सल्लागार आहेत.मस्क यांच्या नेतृत्वाखालील सरकारी कार्यदक्षता विभागाने (डीओजीई) भारतासह अनेक देशांना देण्यात येणारी आर्थिक मदत रोखण्याची घोषणा रविवारी केली होती.याबाबत पत्रकारांनी विचारले असता ट्रम्प यांनी या निर्णयाचे समर्थन केले.

भारतात मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी अमेरिकेकडून २.१ कोटी डॉलर्स देण्यात येत होते.आपण एवढा पैसा भारताला का देत आहोत.भारताकडे भरपूर पैसा आहे.भारत जगात सर्वाधिक कर लावणारा देश आहे.मी पंतप्रधान मोदी आणि भारताचा आदर करतो.परंतु त्यांना एवढा पैसा देण्याची गरज नाही,असे ट्रम्प म्हणाले.
फ्लोरिडातील मार-ए-लागो या आपल्या रिसॉर्टवरील पत्रकार परिषदेत ते बोलत होते.अमेरिकन करदात्यांचा पैसा कोणाला देण्यात येतो असे देश,परदेशी संस्थांची एक यादी मस्क डीओजीईने तयार केली.या यादीतील १५ उपक्रमांना निधी देणे अमेरिकेने बंद केले.यांमध्ये भारतीय निवडणुकीसाठी दिल्या जाणाऱ्या २.१ कोटी डॉलर्सचा समावेश आहे.याशिवाय बांगलादेशला देण्यात येणारी २.९ कोटी डॉलर्स, नेपाळसाठीची ३.९ कोटी डॉलर्सची मदतही अमेरिकेने बंद केली.