Uddhav Thackeray : माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज खेडमध्ये सभा घेतली. यावेळी त्यांनी राज्य सरकार, केंद्र सरकार माजी राज्यपाल यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. खासकरून त्यांनी राज्याचे माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावर सडकून टीका केली आहे.
यामुळे आता चर्चा सुरू झाली आहे. राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी असताना त्यांनी अनेकदा सावित्रीबाई आणि महात्मा फुले, छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत वादग्रस्त विधाने केली होती. यामुळे ते अनेकदा वादात सापडले होते.
हा दोरा धरुन उद्धव ठाकरे यांनी त्यांच्यावर हल्लाबोल केला आहे. एक काळी टोपीवाला होता, गेला. त्याने शिवाजी महाराज यांचा अपमान केला, सावित्रीबाई फुले यांचा अपमान केला. तरीही यांच्या शेपट्या बाहेर येत नाहीत, असे म्हणत त्यांनी केंद्र सरकारवर टीका केली.
तसेच उद्धव ठाकरे म्हणाले, दिल्लीसमोर शेपटी आत घालून बसणे हे बाळासाहेबांचे विचार नव्हते, कदापी नव्हते, आता काहीजण दिल्लीत मुजरा करायला जात आहेत. राज्याचे उद्योग सध्या बाहेर जात आहेत. मात्र यावर कोण बोलत नाही.
मी अडीच वर्षे घरात होतो, कारण कोरोना सुरू होता. असे असले तरी माझी कामे सुरूच होती. आपल्या कामाचे कौतुक देखील करण्यात आलं होतं. आता मात्र सगळं वेगळं असल्याचे ठाकरे यांनी सांगितले.