Shirdi Loksabha : शिर्डी लोकसभा मतदारसंघातून वंचित बहुजन आघाडी निवडणूक लढविण्यास इच्छुक असल्याचा दावा प्रकाश आंबेडकर यांनी बुधवारी येथे केला.
वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी बुधवारी पोलिस अधीक्षकांची भेट घेतली. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. यावेळी वंचित बहुजन आघाडीचे प्रदेशाध्यक्ष किसन चव्हाण, राज्य प्रवक्त्या दिशा पिंकी शेख, जिल्हाध्यक्ष प्रतीक बारसे, शहराध्यक्ष हनिफ शेख, महासचिव योगेश साठे उपस्थित होते.
ते पुढे म्हणाले की, वंचित बहुजन आघाडीचा अद्याप महाविकास आघाडीत समावेश झालेला नाही. पक्षाच्या जिल्हा कार्यकारिणीने शिर्डी लोकसभेची निवडणूक लढवावी, अशी मागणी केलेली आहे. महाविकास आघाडीत समावेश झाला तरीही शिर्डीच्या जागेची मागणी केली जाईल.
लोकसभा निवडणुकीची येत्या मार्चमध्ये आचारसंहिता लागू होईल, लोकसभेच्या कोणत्या मतदारसंघाची जागा कुठल्या पक्षाला मिळते, त्या पक्षाकडे जागेची मागणी करणार असून, त्यादृष्टीने महाविकास आघाडीतील घटक पक्षांशीही चर्चा सूरू आहे.
सोनई येथील गुन्ह्याचा योग्य तपास करावा
- ■सोनई येथील घटनेबाबत पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी काही आरोपींना अटक केलेली आहे.
■आरोपींचा गुन्ह्यात सहभाग आहे किवा नाही, याचा पोलिसांनी तपास घ्यावा.
■जे दोषी नाहीत, अशांवर कारवाई करू नये, अशी मागणी पोलिस अधीक्षकांकडे करण्यात आली असून, पोलिसांनी या गुन्ह्याचा योग्य दिशेने तपास सुरू असल्याचे सांगितले आहे, असे आंबेडकर म्हणाले.