राज्यातील मध्यमवर्गीय आणि गोरगरीब नागरिकांना दिलासा देण्यासाठी 1500 स्क्वेअर फुटपर्यंतच्या घरांना शास्तीकर माफ करावा. शास्तीकरामुळे सर्वसामान्य नागरिकांवर वाढता आर्थिक बोजा पडत असून त्यांना दिलासा देण्यासाठी सरकारने तत्काळ निर्णय घ्यावा अशी मागणी आमदार सत्यजीत तांबे यांनी विधान परिषदेत केली आहे.
मुंबई येथील अर्थसंकल्पीय अधिवेशनात बोलताना आमदार तांबे म्हणाले की, अनेक कुटुंबे आपल्या कष्टाच्या पैशातून घर घेतात. मात्र करांमुळे त्यांना हा नाहक त्रास सहन करावा लागतो. जर सरकारने शास्तीकर माफ केला.

तर मध्यमवर्गीय आणि कष्टकरी नागरिकांना मोठा दिलासा मिळेल. सध्या 600 स्क्वेअर फुटपर्यंत शास्तीकर माफ आहे. तर 600 ते 1000 स्क्वेअर फुटपर्यंत 50% सवलत देण्यात आली आहे.
मात्र त्याऐवजी 1500 स्क्वेअर फुटपर्यंत शास्तीकर पूर्ण माफ करावा आणि 1500 ते 2000 स्क्वेअर फुटपर्यंत 50% कर माफ करावा. संगमनेर शहरातील 3964 अनधिकृत निवासी मालमत्तांचा मुद्दा उपस्थित केला.
या घरांमध्ये कोणताही व्यावसायिक उपक्रम नाही. त्यामुळे या रहिवाशांवर शास्तीकर लादणे अन्यायकारक आहे. असे त्यांनी सांगितले सरकारने या नागरिकांना दिलासा द्यावा आणि शास्तीकर पूर्णपणे माफ करावा.
मंत्री उदय सामंत यांनी या मागणीला सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. 1500 स्क्वेअर फुटापर्यंत शास्तीकर पूर्ण माफ करण्यासाठी धोरणात्मक निर्णय घ्यावा लागेल. त्यासाठी लवकरच बैठक घेण्यात येईल. अशी घोषणा मंत्री सामंत यांनी केली असे ही आमदार तांबे यांनी सांगितले.