शिर्डीतील घाण साफ करायला आणि टारगटांचा कायमचा बंदोबस्त करायला आलोय! डॉ. सुजय विखे पाटील यांचा इशारा

कोल्हार-भगवतीपुर ग्रामसभेत माजी खासदार सुजय विखे यांनी महिलांच्या सुरक्षेसाठी कठोर पावले उचलण्याचा इशारा दिला. गुन्हेगारी प्रवृत्तींवर कायद्यापलीकडे जाऊन कारवाई केली जाईल, असे सांगत गावात नवे नियम लागू करण्यात आले.

Published on -

Ahilyanagar News: शिर्डी- मतदारसंघात वाढती गुन्हेगारी आणि महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनला आहे. याच पार्श्वभूमीवर माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी कोल्हार-भगवतीपूर गावांतील संयुक्त ग्रामसभेत आक्रमक पवित्रा घेतला. “शिर्डी मतदारसंघातील घाण साफ करायला मी आलो आहे. जर माझ्या मतदारसंघातील महिला आणि मुली सुरक्षित नसतील, तर अशा मतदारांची मला गरज नाही,” असे ठणकावून त्यांनी गुन्हेगारांना कडक इशारा दिला.

कोणत्याही पक्षाच्या कार्यकर्त्याला गय केली जाणार नाही आणि महिलांना धमकावणाऱ्यांचा कायमचा बंदोबस्त केला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. भगवतीदेवी मंदिराच्या प्रांगणात झालेल्या या ग्रामसभेत गावातील गुन्हेगारी रोखण्यासाठी कठोर नियमांचे ठराव मंजूर करण्यात आले.

विशेष ग्रामसभेचे आयोजन

कोल्हार-भगवतीपूर गावांमध्ये अलिकडच्या काळात गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे, विशेषतः महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या समस्येवर उपाययोजना करण्यासाठी ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी विखे पाटील यांनी राजकीय मतभेद बाजूला ठेवून सर्वांनी एकत्र येऊन गुन्हेगारीविरुद्ध लढण्याचे आवाहन केले. त्यांनी पोलिस प्रशासनाला तातडीने कारवाई करण्याचे निर्देश देत, अवैध व्यवसायांवर थेट कारवाईचा इशारा दिला. तसेच, महिलांनी कोणतीही तक्रार आणल्यास ती त्वरित नोंदवून कारवाई करण्याचे आदेशही दिले.

ग्रामसभेत अनेक ठराव मंजूर

ग्रामसभेत गावातील गुन्हेगारी नियंत्रणात आणण्यासाठी अनेक कठोर ठराव मंजूर करण्यात आले. यामध्ये रात्री दहा वाजेनंतर डीजे पूर्णपणे बंद करणे, आवाजाची मर्यादा पाळणे, फ्लेक्सवर बंदी घालणे, फ्लॅटधारक आणि भाडेकरूंना घरे देण्यापूर्वी ग्रामपंचायतीची परवानगी घेणे बंधनकारक करणे, गावातील मुख्य रस्त्यांवर सीसीटीव्ही कॅमेरे बसवणे, बसस्थानकासमोर छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा उभारणे, रात्री नऊ वाजेनंतर सर्व दुकाने, परमिट रूम, स्टॉल, टपऱ्या आणि हॉटेल्स बंद करणे, तसेच रात्री नऊनंतर तीनपेक्षा जास्त लोक एकत्र आढळल्यास त्यांच्यावर कारवाई करणे यांचा समावेश आहे. या नियमांचे काटेकोरपणे पालन व्हावे, यासाठी ग्रामपंचायतीला सक्त सूचना देण्यात आल्या.

प्रशासनाची सहकार्याची भूमिका

डॉ. भास्करराव खड़े यांनीही यावेळी आपले मत मांडले. ते म्हणाले की, गावात वाढत्या गुंडगिरीमुळे गावाची प्रतिमा मलिन होत आहे. सर्वसामान्य नागरिकांना पोलिसांकडून त्वरित न्याय मिळत नाही, याकडे त्यांनी लक्ष वेधले. त्यामुळे पोलिस प्रशासनाने अधिक सक्रिय होऊन स्थानिकांच्या तक्रारींचे तातडीने निराकरण करावे, अशी मागणी त्यांनी केली. या ग्रामसभेत गावकऱ्यांनीही आपल्या सूचना मांडल्या आणि गुन्हेगारी रोखण्यासाठी प्रशासनासह सहकार्य करण्याची तयारी दर्शवली.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe