Maharashtra Politics : विरोधकांना काही कामधंदा राहिला आहे का? असा सवाल करून आम्ही काम करतो, केवळ आरोप करणे हेच काम विरोधकांना असून त्यांच्या आरोपांना आम्ही कामातून उत्तर देत आहोत.
त्यांनी बंद ठेवलेले प्रकल्प आम्ही सुरू करत आहोत. आम्ही कामच करतो, अहंकारी वृत्तीचे राज्यकर्ते नसतात. असे करून राज्य चालतही नाही, त्यामुळे त्यांच्या बोलण्याकडे आम्ही लक्ष देत नाही.
आम्ही आमचे काम करत राहतो. दररोज सकाळी उठले की विरोधकांना टीका करणे एवढेच काम शिल्लक राहिले असल्याची टीका संजय राऊत यांचे नाव न घेता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली.
मुख्यमंत्री सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर तालुक्यातील दरे या गावी दौऱ्यावर आले असून त्यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
मुख्यमंत्री शिंदे पुढे म्हणाले, मराठा समाजाच्या आरक्षणाबाबत आम्ही सर्वपक्षीय बैठक घेतली होती. आम्ही सर्वजण मिळून आरक्षणाच्या मुद्द्यावर काम करणार आहोत. मराठा समाजाने शासनाच्या आश्वासनानंतर उपोषण मागे घेतले आणि आमच्यावर विश्वास ठेवला, त्याबद्दल मनोज जरांगे-पाटील, मराठा समाज यांना मी धन्यवाद दिले आहेत.
कायद्याच्या चौकटीत बसणारे, कायम टिकणारे आणि इतर कुठल्याही समाजावर अन्याय न करता मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी आम्ही दिवस-रात्र काम करत आहोत.
विरोधक उठसुट टीका करत असले तरी येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीत आम्ही केलेले काम, गेल्या नऊ वर्षांत मोदींच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारने केलेले काम, राबवलेल्या योजना याचे मोजमाप जनता निश्चित करेल.
आरोप करणाऱ्या विरोधकांना त्याचे सडेतोड उत्तर मिळेल. राज्यात आम्हाला लोकसभेच्या ४५ जागा मिळतील, असा विश्वास मुख्यमंत्री शिंदे यांनी व्यक्त केला.
राज्यात बांबू लागवडीची महत्त्वाकांक्षी योजना हाती घेण्यात येत असून यामुळे कोयना विभागाच्या आर्थिक विकासाला हातभार लागणार आहे. हा उद्देश ठेवून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यात, कोयना- कांदाटी विभागात बांबू लागवडीला प्रोत्साहन दिले आहे.