Ahmednagar Politics : आठ दिवस गडी कामाला लावायचे आणि बायका पोरं घेऊन परदेशात जायचं असं काम मी करत नाही. कधी कोणाला वरच्या आवाजात बोललो नाही, कधी कोणाला मोबाईल फेकून हाणला नाही, कधी कोणाला गाडीतून खाली उतरवलं नाही.
जे लोकांना फुकटचा मानसन्मान सुध्दा देऊ शकत नाहीत. अशी माणसं दुसऱ्यांसाठी काय करणार असे म्हणत आमदार प्रा.राम शिंदे यांनी आ.रोहित पवार यांच्यावर कडाडून हल्ला चढवला.

आमदार प्रा.राम शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त कर्जत-जामखेड मतदारसंघात गावोगावी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले होते. यावेळी ते बोलत होते. ते म्हणाले
गेल्या तीन वर्षांपूर्वी मतदारसंघातील परिस्थिती बदलली होती. पण आता कार्यकर्त्यांच्या लक्षात आलयं की, आपला गडी तो आपलाच असतो. लय बाहेरचा गडी कामाला ठेवून त्यो कधी गबाळ घेऊन जाईल याचा भरवसा नाही.
रातच्याला त्याच्या ध्यानात आलं की आता इथं काही मजा नाही त्यो गडी कधी पळून जाईल सांगता येत नाही. गावातला गडी निघून गेल्यावर त्याला समजावून सांगता येतं पण बाहेरचा गडी रातच्याला निघून गेल्यावर कुठून आणायचा? अशी परिस्थिती आहे.
त्यामुळे आपल्या माणसाच्या पाठीशी खंबीरपणे उभे रहा, या भागातल्या, परिसरातल्या ज्या ज्या अडचणी आहेत त्या माझ्या एवढ्या कोणालाच माहित नाहीत. त्या मी सोडवल्याशिवाय राहणार नाही. सर्वसामान्य माणसाच्या आयुष्यात आनंद आला पाहिजे.
प्रगती झाली पाहिजे. हेच आपले धेय आहे. येणाऱ्या कालखंडामध्ये कोणाच्या नादाला लागू नका. भूलथापांना बळी पडू नका. मागच्यावेळी जी चुक केली ती पुन्हा करू नका, आता आपलाच नाद करा. जलसंधारण मंत्री असताना जलयुक्त शिवार योजना आपल्या भागात प्रभावीपणे राबवली. त्यामुळे गेल्या पाच वर्षांत जामखेड तालुक्यातील एकाही गावात टँकर लागला नाही. असेही ते म्हणाले. यावेळी मोठ्या संख्येने नागरिक व कार्यकर्ते उपस्थित होते.