Maharashtra News : देशात वाढलेल्या बेरोजगारी,महागाईमुळे सामान्य जनतेचे जगणे मुश्किल झाले आहे. सत्ताधाऱ्यांनी इतक्या चुका केल्या आहे की, आमची आगामी निवडणुकांची लढाई त्यामुळे सोपी झाली आहे,
प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष, माजी मंत्री जयंत पाटील यांनी केले. तसेच निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांना आगामी काळात संघर्ष करण्यास तयार राहण्याचे आवाहनही त्यांनी केले.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत शिर्डी येथे ज्योत निष्ठेची- लोकशाहीच्या संरक्षणाची अंतर्गत पक्षाच्या दोन दिवसीय शिबिराला कालपासून सुरुवात झाली.
या शिबीरातून लोकसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकले जाणार आहे. यावेळी खासदार सुप्रिया सुळे, खासदार अमोल कोल्हे, खासदार फौजिया खान, जितेंद्र आव्हाड, हेमंत टकले, अंकुश काकडे, एकनाथ खडसे, अनिल देशमुख, आमदार संदीप क्षिरसागर, आमदार प्राजक्त तनपुरे, सुरेश वाबळे, महेंद्र शेळके आदींची प्रमुख उपस्थिती होती.
आमदार रोहित पवारांची शिबीरातील अनुपस्थीती चर्चेचा विषय ठरली. प्रदेशाध्यक्ष पाटील व सुप्रिया सुळे यांनी ते परदेशात गेल्याचे तर जितेंद्र आव्हाड यांनी ते आजारी असल्याचे सांगितल्याने गोंधळात भर पडली.
पाटील पुढे म्हणाले की, पहिल्या फळीतील अनेक नेते पक्ष सोडून गेल्याने मागच्या फळीत बसलेल्यांना यंदा पुढे येण्याची संधी मिळाली आहे. आपले काम इतरांपेक्षा सोपे आहे. आपल्याला फार यंत्रणेची गरज नाही.
सत्ताधाऱ्यांच्या चुका काय आहेत? देशातील महागाई, बेकारी व ज्या घटना मागच्या काळात घडल्या त्यावर लक्ष केंद्रित करून त्या लोकांसमोर आणा, असा कानमंत्रही पाटील यांनी कार्यकर्त्यांना दिला. पुणे जिल्ह्यात डॉ. अमोल कोल्हे यांच्या यात्रेला उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला आहे.
मात्र, त्यांना पाडण्याचा विडा आता काही जणांनी उचलला आहे. कोल्हे यांच्यावर शिवाजी महाराज व आईभवानीचा आशिर्वाद असून सगळा पक्ष त्यांच्या मागे ताकदीने उभा आहे. तेव्हा त्यांनी घाबरण्याचे कारण नाही, असेही पाटील म्हणाले.
यावेळी माध्यमांशी बोलतांना माजी मंत्री जितेंद्र आव्हाड म्हणाले की, राष्ट्रपती मुर्मू यांना संसदेच्या उद्घाटनासही बोलावले नाही. एक महिला आणि त्याही आदीवासी यांना नको आहे का? त्यांना केवळ राष्ट्रपती भवनात बंदिस्त करून ठेवण्यासाठी राष्ट्रपती केलयं का?
श्रीराम आदींवासीचाही देव आहे. राममंदिरासाठी देशभरातून पैसा जमा केला. हे मंदिर म्हणजे कुणा न्यासाची खाजगी मालमत्ता नाही. त्यामुळे कोणाला निमंत्रण द्यायचे व कुणाला नाही हे ते कोण ठरवणार ?
या शिबीरात पहिल्या दिवशी खासदार रोहणी खडसे, आशिष जाधव, मेहबुब शेख, सुलक्षणा सलगर, सुरेंद्र जोंधळे, विश्वंभर चौधरी आदींनी आपले विचार व्यक्त केले. दुसऱ्या दिवशी अशोक वानखेडे, हिना कैसर खान, निरज जैन, संजय औटे आदी वक्ते बोलणार असून समारोपाचे मार्गदर्शन पक्षाध्यक्ष शरद पवार करणार असल्याचे सांगण्यात आले.